पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इंडो-युरोपियन कुळातल्या म्हणून हिंदुस्तानी वा भारतीय भाषा म्हणून ओळखल्या जातात. प्राचीन साहित्यात या सर्वांचे सर्वंकष उल्लेख आढळतातच असे नाही. कारण ब-याच जाती, जमाती, जनसमूह हे संपर्क व संबंध क्षेत्रांपासून वा मनुष्य वस्तींपासून दूर राहात व संपर्क करणे केवळ अशक्यप्राय होते. असा विस्तृत व वैविध्यपूर्ण समाज हिंदू म्हणून सर्वसाधारणपणे ओळखला जायचा. हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे हे अनिवार्य घटक होत.

 हे जनसमूह जाती व वर्णात विभागल्याचे दिसून येते. 'जात' व 'वर्ण' दोन्ही शब्द भिन्न होत. जात शब्द वंशसूचक तर 'वर्ण व्यवसाय वा सामाजिक स्थान सूचक होय. एका वर्णात अनेक जातीचे लोक आढळतात. यावरून वर्ण व्यापक अर्थाचा व आशयाचा शब्द असल्याचे स्पष्ट होते. ब्राह्मण ग्रंथात वा उपनिषदांत चार वर्षांचे (चातुर्वर्ण) उल्लेख आहेत - ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. परंतु जात म्हणाल तर चांडाळ, पोल्कस, निषाद, दास, शबर, भिषज, रथकार, वृषल, इ. या सर्वांच्या अभ्यासाशिवाय हिंदू संस्कृतीचा अभ्यास पूर्ण होणार नाही.

 हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे साधन घटक म्हणून वेद अनिवार्य ठरतात. चातुर्वण्र्याप्रमाणे वेदही चार आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आचार्यांनी प्रस्तुत निबंधात यांचे विस्तृत विवेचन केले असले, तरी लेखाच्या विस्तारभयाने मी ते अशासाठी टाळतो की ती माहिती सर्वविदित आहे. म्हणजे किती ऋचा आहेत, वेदाचा वर्ण्यविषय काय इ. विशेष म्हणजे आपणापर्यंत वेद आणण्याचं जतन कार्य कुणी केले असेल तर ते कृष्ण द्वैपायन यांनी. त्यांना दुवा द्यावा तेवढा थोडा. हे वेद अनेक शाखांत लिहिल्याचे आढळते. काही शाखांचे उल्लेख आढळतात, पण संहिता उपलब्ध होत नाहीत असे अभ्यासाअंती लक्षात येते.

 हिंदू संस्कृतीच्या पारंपरिक अभ्यासाला नवी दिशा देण्याचे कार्य सन १९०७ च्या उत्खननाने केले. त्यातून विशेषतः आर्य भाषा परंपरेवर नवा प्रकाश पडल्याचे दिसून येते. प्रो. ह्यूगो विकलरनी आणि मॅक्स मुलर वा ग्रियर्सन महोदयांनी इथल्या भाषांचे जे संशोधन, अभ्यास, संग्रह, वर्गीकरण केले, त्यानुसार हिटाईट व मित्तांती वर्गातील शब्दसमूह व हिंदू (आर्य) शब्दसमूह यात साम्य आढळते. त्यावरून इथले जनसमूह त्या प्रांतातून इथे स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट होते. असाच अभ्यास शिल्प, अन्नपदार्थ, दागिने, पोषाख यांच्या नावांच्या अंगांनी झाला असून त्यातूनही सांस्कृतिक अंतःसंबंधाचे पक्के दुवे हाती येतात. त्यांच्या आधारे हिंदू संस्कृतीचा अभ्यास होत असताना नित्य नवे संशोधन म्हणजे पूर्व अभ्यासावर कालौघात जमलेली

साहित्य आणि संस्कृती/११४