पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठे साहाय्य केल्याचे दिसून येते.) या पार्श्वभूमीवर इंग्रज भारतात आले तेव्हा येथील समाज व्यवस्था कशी होती? तर त्याचे वर्णन ‘अर्ध-सभ्य असे करता येईल. म्हणजे देशात न्यायालय व सैन्य होते, पण जनता असुरक्षित होती. इथे विद्वान व धर्ममार्तंडांची कमतरता नव्हती. पण जनता मात्र अज्ञानी होती. समाजातील निम्न वर्गाचे लोक, तळागाळातील समाज अंधश्रद्ध होता. आर्थिक विषमता स्पष्ट होती. उद्योगधंद्यांचा अभाव होता. कला होती, पण तीवर समाजातील अभिजात वर्गाचे म्हणजे राजे, उमरावांचे वर्चस्व व नियंत्रण होते. तत्कालीन इंग्रज इतिहासकारांनी अर्धसभ्य भारताचं वर्णन अत्यंत सहानुभूतीपूर्वक करत एक मार्मिक शब्द वापरला होता Mistic भारत ‘रहस्यमय' देश आहे. इथल्या सर्वांगीण रहस्याचा अभ्यास करणा-यांमध्ये मॅक्स मुलर केलेला भाषिक अभ्यास महत्त्वाचा. त्यांनी आशियाई व युरोपियन भाषांतील दुवे शोधले व संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. मानववंश शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध केले की येथील सर्व आर्य नव्हते. येथील संस्कृतीवरील विविध प्रभाव या अभ्यासातून पुढे आले.

 जी गोष्ट भारतीय संस्कृतीची तीच भारतीय कला व साहित्याचीही. आचार्य द्विवेदी यांनी प्रस्तुत निबंधातून सभ्यता, संस्कृती परिभाषित करून त्या कसोटीवर भारतीय संस्कृतीची चिकित्सा केली व पुढे संस्कृती व साहित्याचा अन्योन्याश्रित संबंध या निबंधाद्वारे रेखांकित केल्याचे दिसते. भारतीय धर्म, संस्कृतीवर असा बाह्य प्रभाव (स्थलांतरित जमाती व विदेशी आक्रमक दोघांचाही) दिसून येतो, तसाच तो तेथील साहित्य, कलांवरही झालेला आढळतो. अजंठ्याची लेणी, चित्रे याचे उदाहरण म्हणून पाहता येण्यासारखे आहे. कालिदास काव्य, नाट्यावरील आर्येतर प्रभाव स्पष्ट आहे. पण महाभारत शुद्ध भारतीय म्हणून सांगता येईल. भारतीय नाट्यशास्त्र ही काही आर्यकला नव्हे. भारतीय नाटक मूकनाटक होते. नाटकात भाषेचा वापर आर्यांच्या आगमनानंतरचा आहे. आर्य, द्रविड, यक्ष, नाग इ. जमाती, टोळ्यांनी इथली संस्कृती आकारली, बदलली तशी येथील साहित्य, कलांमध्येही बदल घडून आले. ग्रीक, बॅबिलोनियन, असेरियनांचा प्रभाव येथील ज्योतिषशास्त्रावर दिसून येतो. सुफींचा प्रभाव इथल्या भक्ती व देव स्वरूपावर आहे, साहित्यावर आहे, हे कोण नाकारेल? मुस्लिमांचा प्रभाव येथील वास्तुकलेवर केवढा मोठा आहे. क्षणभर विरोधी वाटल्या तरी वास्तव म्हणून हे सारे आपणास स्वीकारावंच लागेल. इतिहास व संस्कृती या अशा गोष्टी असतात की त्या आपणास नाकारता नाही येत. त्यांचा

साहित्य आणि संस्कृती/१११