उपभोगतो. संस्कृतीचा समाज, संस्कार व विज्ञान यांच्याशी जवळचा संबंध असतो. धर्म व संस्कृती यांच्याबाबत ते म्हणतात की, ज्या वेळी धर्म कट्टर व दुराग्रही बनतो त्या वेळी त्याचा संस्कृतीशी संबंध तुटतो. हीच गोष्ट विज्ञानाच्या बाबतीतही खरी आहे. धर्म आचारांच्या व कर्मकांडाच्या कचाट्यात सापडल्यानंतर कर्मठ बनतो. पण धर्मात नवविचारांचे पंथ विलीन होतात व त्याला प्रेरणा संस्कृती देत असते. विज्ञानामुळे समाजात नवे विचार निर्माण होतात. भौतिक समृद्धी निर्माण होते पण संस्कृतीशिवाय जीवन आशयघन होत नाही. कला, साहित्य, संगीत जीवनात आनंद निर्माण करतात. कारण कलेचा उद्देश मनोरंजन असतो.
या प्रकरणातील दोन महत्त्वाचे लेख म्हणजे ‘पं. नेहरूंचे संस्कृतीविषयक विचार’ आणि ‘कलेच्या वळचणीतील संस्कृती. त्यांच्या मते पंडित नेहरूंच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असला तरी भारतीय संस्कृतीचे यथार्थ स्वरूप त्यांनी जाणले होते व त्यांच्या व्यक्तिगत आचरणात भारतीयता प्रकट होत होती. म्हणून त्यांनी संस्कृती संवर्धनासाठी अनेक संस्थांची निर्मिती केली. डॉ. लवटे यांनी ‘सत्तेच्या वळचणीत संस्कृती' या लेखाचे भाषांतर पण या पुस्तकात समाविष्ट केले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदीतील हा संस्कृती विचार आपली भारतीय संस्कृतीबद्दलची जाण समृद्ध करतो. भारतीय संस्कृतीचे मूळ स्वरूप करताना हे अभ्यासक सांगतात की ही संस्कृती ही उदार, ग्रहणशील आणि बहलतावादी होती. परिवर्तन हा तिचा आत्मा होता आणि भारतीय समाजाच्या अंतर्यामी तो सतत प्रगतीची प्रेरणा देत होता. पण त्याचबरोबर या संस्कृतीत जातीवाद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि धर्मभोळेपणा हे दोष होते. धर्म यातुप्रधान असल्यामुळे सकाम भक्तीवर लोकांचा विश्वास होता. त्यामुळे भारतीय संस्कृती भारतीय समाजाची प्रगती साधल्यास तेवढ्या प्रमाणात साह्यकारक ठरली नाही, म्हणून या परंपरेतील टाकाऊ गोष्टी नष्ट करून तिच्यातील टिकाऊ व शाश्वत मूल्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे व हाच या पुस्तकांचा संदेश आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या या पुस्तकाचे वाचक चांगले स्वागत करतील अशी उमेद मी बाळगतो.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक