पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणूस जगत असताना त्याला दोन प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागत असतात. एक म्हणजे स्थूल भौतिकाची जी त्यांच्या अंतर्यामी न संपणारी तहान असते त्यातून मुक्त होणे. म्हणजे चंगळवादी वृत्तीचा त्याग करणे. दुसरे म्हणजे सूक्ष्मतम अशा ऊर्ध्वगामी वृत्तीचा अंगीकार करणे. कबीरदासांनी या अवस्थेचे वर्णन करताना म्हटले होते की साधकास अनहत् नाद ऐकू यायला हवा. म्हणजे समजायचे की घर, संसाराच्या जंजाळातून मुक्त झाला. ही असते माणसाची विजय यात्रा! एकदा का माणसाची घडण प्रगल्भ झाली की मग तो सांघिक, सामाजिक जीवनाचा विचार करू लागतो. म्हणजेच तो सभ्य होऊ लागतो.

 मानवी सभ्यतेचा विकास काही एका रात्रीत झालेला नाही. ते माणसाच्या प्रयत्न सातत्याचे फळ होय. ही प्रक्रिया स्पष्ट करत आचार्यांनी सांगितले आहे की, “ज्यों-ज्यों मनुष्य संघबद्ध होकर रहने का अभ्यस्त होता गया, त्यों-त्यों उसे सामाजिक संघटन के लिए नाना प्रकार के नियम कानून बनाने पडे। इस संघटन को दोषहीन और गतिशील बनाने के लिए उसने दंडपुरस्कार की व्याख्या भी की, इन बातों को एक शब्द में ‘सभ्यता' कहते है। आर्थिक व्यवस्था, राजनैतिक संघटन, नैतिक परंपरा और सौंदर्यबोध तीव्रतर करने की योजना; ये सभ्यता के चार स्तंभ है। इन सबके सम्मिलित प्रभाव से 'संस्कृति' बनती है। सभ्यता मनुष्य के बाह्य प्रयोजनों को सहजलभ्य (सहजसाध्य) करने का विधान (पद्धति) है और संस्कृति प्रयोजनातीत (उपयोगितेपलीकडील) आंतर आनंद की अभिव्यक्ति। (अशोक के फूल - पृ. ७३). हे चिंतन म्हणजे आचार्यांच्या गंभीर चिंतनाचा आरसाच.

 माणसाची जी म्हणून कमेंद्रिये नि ज्ञानेंद्रिये होत, त्यांचा संबंध माणसाच्या बाह्य आचरणाशी असतो. हा व्यवहार स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा हवा. म्हणजेच सभ्यतेकडून संस्कृतीकडे जाणे होय. अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंदातून हा प्रवास होतो. बाह्यतेकडून अंतरंगाकडे जाण्याची शिकवण भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया होय. हे सारे असते विवेक नि वैराग्याचे द्वंद्व. विवेक एकपरी सहजशक्य असतो. पण वैराग्याला मोठे बळ लागते. वैराग्य म्हणजे सत्य व असत्यापैकी जे योग्य असेल त्याचा त्याग. माणूस इथेच हरतो नि हात टेकून सामान्य राहतो. माणूस जेव्हा देवऋण, ऋषीऋण, पितृऋणातून मुक्त होतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्ती होते, सांगणाच्या तत्त्वज्ञानावर भारतीय संस्कृती उभी आहे. हा कृतज्ञताभाव हे भारतीय संस्कृतीचं सार होय व तीच या संस्कृतीने जगाला दिलेली देणगी होय.

साहित्य आणि संस्कृती/१०७