पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निबंधाची शैली वर्णनात्मक न राहता ती व्याख्या नि विश्लेषणाच्या जवळ जाणारी चिकित्सक व मीमांसा शैली बनवली आहे.
 या निबंधाचा प्रारंभच मुळी आचार्यांनी संस्कृतीच्या व्याख्येने केला आहे. त्यामुळे त्यांना अभिप्रेत संस्कृतीचं रूप, स्वरूप कळण्यास मदत होते. ते म्हणतात, “नाना प्रकार की धार्मिक साधनाओं, कलात्मक प्रयत्नों और सेवा, भक्ति तथा योगमूलक अनुभूतियों के भीतर से मनुष्य उस महान सत्य के व्यापक और परिपूर्ण रूप को क्रमशः प्राप्त करता जा रहा है, जिसे हम ‘संस्कृति' शब्द द्वारा व्यक्त करते है।" (अशोक के फूल - पृ. ६८) धर्म साधना, कला, भक्ती आणि जीवनानुभवातून येणारी व्यापकता वा परिपूर्णता देणारे माध्यम म्हणजे संस्कृती. ही एक व्यक्ती व समाजाची संयुक्त प्रक्रिया आहे. तिचे नेमके रूप सांगणे कठीण. असे प्राचीन साहित्यात ईश्वर रूप चर्चा है। 'नेति नेति' चर्चेतून ईश्वराचे अनिर्वचनीय रूप प्रकटते तसे संस्कृतीचेही आहे. तिची प्रक्रिया व्यामिश्र खरी! संस्कृती मानव समाजास लाभलेले वरदान आहे. यातून एक दिवस मनुष्य युद्धसंघर्ष, कूटनीतिक डावपेच, शोषण, अत्याचार इत्यादीतून मुक्त होईल. आचार्यांचा हा आशावाद म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा विधायक दृष्टिकोणच होय. आचार्यांच्या म्हणण्यानुसार संस्कृती ही एका देश विशेषाची ओळख असतच नाही मुळी. संस्कृती असते एक वैश्विक चेहरा. ती असते माणसाची सर्वश्रेष्ठ तपस्या. संस्कृती आगळी वेगळी असते खरी, संत कबीरदास सांगून गेलेत, 'ऐसा लो नहिं तैसा लो, मैं केहि विधि अनुठा लो।' रवींद्रनाथांनी तर संस्कृतीला संगीत स्वरांची छेडलेली मंथर, मृदू तार, स्वर म्हटले होते. या सर्वांची आठवण करून देत आचार्य आपणास संस्कृतीचे स्वरूप समजावतात.

 जग हे भारताप्रमाणेच वैविध्याने भरलेले आहे नि भारलेलेपण! अशा भिन्न देश नि जातींनी एकमेकांच्या जवळ येण्यानेच आपण व्यापक विश्व सत्याचा शोध घेऊ शकू. आचार्यांवरील रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव इथे स्पष्ट होतो. हा निबंध शांतीनिकेतनच्या त्या शांत, निसर्ग समृद्ध वातावरणात स्वातंत्र्याची पहाट होताना लिहिला गेलाय याची मला तुम्हाला आठवण करून घ्यावीशी वाटते. संत रज्जबदासनी कधी काळी म्हटले होते, ‘सब साँच मिले तो साँच है, न मिले सो झूठ।' संस्कृती म्हणजे अंतिम सत्याचा, मानवाच्या अंतिम कल्याण, विकासाचाच शोध ना? निसर्गाप्रमाणे संस्कृतीही नित्य, निरंतर विकासमान असते. पृथ्वीवरील जीवन त्याचाच एक भाग होय.

साहित्य आणि संस्कृती/१०६