पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सहवास लाभला. पुढे ते बनारस हिंदू विद्यापीठात विभागप्रमुख झाले. लखनऊ विद्यापीठाने त्यांना डी.लिट्. ही मानद पदवी त्यांच्या साहित्य, भाषा, शिक्षण कार्यातील योगदानाबद्दल १९४९ मध्ये बहाल केली. याच कार्याबद्दल भारत सरकारने सन १९५७ मध्ये ‘पद्मभूषण'ने गौरविले होते. साहित्य अकादमीने त्यांना रवींद्र सन्मान' दिला होता. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, नॅशनल बिब्लिओग्राफी, अभिनव भारती ग्रंथमालेतील त्यांचे कार्य व योगदान अविस्मरणीय. ते सन १९६० ते १९६७ मध्ये पंजाब विद्यापीठात होते. नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून निवृत्त झाले.

 आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी हिंदी साहित्यात मानवतावादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘हिंदी साहित्य की भूमिका' (१९४0) सारखा ग्रंथ त्यांनी शांतीनिकेतनमध्ये शिकवत असताना हिंदीतर भाषांना हिंदी साहित्याचा परिचय करून देण्यासाठी लिहिला. या लेखनात त्यांना बौद्ध धर्म अभ्यासक प्रो. विंटरनित्स आणि भदंत आनंद कौसल्यायन, संस्कृतपंडित नित्यानंद विनोद गोस्वामी, वेणीमाधव बरूआ प्रभृतींचे साहाय्य लाभले होते. आचार्य द्विवेदी हिंदीतील श्रेष्ठ निबंधकार होते. ‘अशोक के फूल' (१९४८), ‘कल्पलता' (१९५१), ‘विचार और वितर्क' (१९५४), ‘कुटज' (१९६७), “आलोक-पर्व' (१९७२) आणि मरणोपरान्त त्यांच्या चिरंजीवांनी मुकुंद द्विवेदींनी संपादिलेला ‘भाषा, साहित्य और देश' हे त्यांचे निबंध संग्रह. ‘अशोक के फूल', 'नाखून क्यों बढते है?' सारखे निबंध त्यांच्या भाषा, शैली व विचार सामथ्र्याचे प्रतीक होत. बाणभट्ट की आत्मकथा' (१९४७) ही कादंबरी लिहून आपण उत्तम ललित लिहू शकतो हे दाखवून दिले. नंतर त्यांनी चारू चंद्रलेख' (१९६३), ‘पुनर्नवा' (१९७३), ‘अनामदास का पोथा' (१९७६) लिहून कादंबरीची एक वेगळी परंपरा विकसित केली. इतिहास व संस्कृती वर्णनातून मिथक चरित्रांचा अभ्यास असे सूत्र घेऊन ते कादंब-या लिहीत. समीक्षक म्हणून लिहिलेल्या 'कबीर' (१९४२), ‘नाथ संप्रदाय' (१९५०), ‘साहित्य का मर्म (१९४९), ‘लालित्य मीमांसा (१९६२) ग्रंथांतून त्यांच्यातील विचारवंत स्पष्ट होतो तर ‘संदेश रासक (१९६0), ‘पृथ्वीराज रासो' (१९५७) मधून संपादक. आचार्य द्विवेदी लिखित 'मृत्युंजय रवींद्र' (१९६३) चरित्र वाचनीय आहे.

 भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक असून आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी ‘संस्कृती' विषयावर स्वतंत्र ग्रंथ न लिहावा याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. तथापि, त्यांनी संस्कृती विषयावर अनेक निबंध लिहिले आहेत.

साहित्य आणि संस्कृती/१०२