पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुजाण नागरिकाच्या प्रतीक्षेतील भारत


 ‘इंडिया शायनिंग', ‘डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया' सारख्या घोषणा लोभस खन्या. त्या बहुधा भौतिक समृद्धी प्रतिबिंबित करीत असतात. ‘स्मार्ट सिरीज'चं स्वप्नही याच पठडीतलं. कोणताही देश विकासाचीच स्वप्नं पाहणार. त्यात गैर काहीच नाही. प्रश्न आहे, तो सत्यास सामोरं जायचा नि भीषण वास्तव बदलण्याचा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आपणास नवनवी स्वप्नं देत राहिले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात रामराज्याचं स्वप्न दिलं. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी कृषी, औद्योगिक विकासाचं स्वप्न दिलं. लाल बहाद्दर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान'चा मंत्र दिला. इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ'ची घोषणा दिली. राजीव गांधींनी ‘संगणक क्रांती'चं स्वप्न दिलं. मनमोहन सिंगांनी ‘जागतिकीकरण' आणलं. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा जागी केली. असं सर्वांबद्दल सांगता येईल. या सर्व स्वप्नांतून भारत सतत प्रगतिपथावर अग्रेसर राहिला. पण या देशाकडे असलेलं मनुष्यबळ, देशाची निसर्गसंपत्ती, घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, विज्ञाननिष्ठा ही मूलतत्त्वे या सर्वांचा विचार करता आपली प्रगती कासवाचीच राहिली आहे, हे सिद्ध करण्यास आणखी कोणतं भाष्य करण्याची गरज नाही. या उलट याच विकासकाळात जगातील अन्य छोट्या देशांची प्रगती पाहत असताना, आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. जपान, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हाँगकाँग पाहत असताना मला हे पदोपदी जाणवायचं. शिवाय अलीकडे भारतीयांचं विदेश जाणं कितीतरी पटींनी वाढलं. भारतातील माणूस विदेशी गेला की तिथल्या माणसांसारखा सुसंस्कृतपणे वागतो. परत भारतात पाऊल ठेवलं की तो भारतीय होतो. मग तो ओळीत घुसतो. कागद-कपटे कुठेही टाकतो. पचकन थुकायला तो घाबरत नाही. लघवीला

सामाजिक विकासवेध/९८