पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भिक्षा प्रतिबंधक गृहाची उभारणी अनिवार्य असताना, ती प्रशासकांना माहीत असू नये, याला काय म्हणावे?
 हे नि असे अनेक प्रश्न आपणाला मुळात माहीत नसणे हेच आपल्या स्वकेंद्रित मनुष्यसमाजाचे खरे दुखणे आहे. यासाठी समाजजाणिवेचा आपला परीघ रुंद करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. 'स्व'च्या पलीकडे जाऊन 'see the world from other side'च्या पुढे 'see te world from his or her side' चा सामाजिक दृष्टिकोन जोवर आपण अंगीकारणार नाही, तोवर समाजपरिघाबाहेरील वंचित ‘अल्पसंख्याक' नसून ते ‘दखलपात्र संख्याक' आहेत, सामाजिक न्यायाचे पहिले हक्कदार तेच आहेत, याची तुम्हाला खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने हा उपेक्षित जनसमुदाय ज्या संस्था, इस्पितळे, उपचार केंद्रे, शिबिरे, छावण्या, वस्त्या इत्यादींत राहतो, तिथे आपली पावले व मने जाणीवपूर्वक व संवेदनशील होऊन वळतील तर या उपेक्षित, बहुसंख्य माणसांचं जीवन समाजपरिघाबाहेरून समाजकेंद्री येईल, ते समाजाच्या मध्यप्रवाहात येऊन मध्यवस्तीत सुस्थापित होतील तो सुदिन! त्याचसाठी असावे आजचे हे राष्ट्रीय चर्चासत्र!! राष्ट्रीय संकल्प!!!

◼◼

सामाजिक विकासवेध/९७