पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपल्या देशात कायदे, धोरणे व योजनांचा सुकाळ असला तरी अंमलबजावणी व लाभाथ्यापर्यंत लाभ पोहोचणे यात असणारे जे अंतर आहे ते विषम असल्याने कायदे, योजना कागदी बाण बनून जातात. शासकीय यंत्रणा संवेदनशील व कार्यक्षम नसणे व जबाबदार प्रशासनाचा अभाव ही ज्येष्ठ नागरिक विकास व कल्याणातील खरी तूट व त्रुटी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचे जगणे बहाल करणारे जपान, सिंगापूर, फिनलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांपैकी अनेक देश मी पाहिले आहेत. तिथले प्रशासन ज्येष्ठ नागरिकांकडे कृतज्ञतेने वागताना मी अनुभवले आहे. आपणाकडे प्रशासन उपकाराच्या भावनेने वागते. यात उर्मटपणा आहे व कृतघ्नताही ती दूर व्हायची तर भारतीय प्रशासन मानवसेवी व संवेदनशील बनविणे जरुरीचे आहे; तरच वृद्ध सन्मानित व प्रतिष्ठित जिणे जगू शकतील.

◼◼

सामाजिक विकासवेध/९३