पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकला? डोक्याचे शिकला की पोटाचे शिकला ? असे प्रश्न वारंवार पडतात. जगामध्ये ‘प्रबोधन' नावाचे जे युग निर्माण झाले, त्याने माणसाला ‘माणूस कोण आहे? हे शिकविले. आपण सगळ्या धर्म व अध्यात्माच्या संस्थापकांचा विचार केला तर या लोकांनी आपापल्या परीने खरं काय नि खोटं काय याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. ‘दत्ता बाळ यांनी ‘विज्ञान आणि अध्यात्म' हे एका सूत्राने छान पद्धतीने सांगितले आहे."अध्यात्म म्हणजे व्यक्तीच्या अंगांनी घेतलेला शोघ, तर विज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ अंगांनी तटस्थपणे केलेला सत्याचा शोध होय." आज पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही, हे सत्य आहे आणि हे सत्य ज्ञानाचा पराभव करणारं आहे. १९७० साली गारगोटीत शंकर धोंडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाने मला हा परिसर समजावून सांगितला. आपण शिकत असताना नोकरीचे सत्य शोधत असतो. वास्तव बदलले आहे. माझ्या समाज निरीक्षणानुसार गेल्या ३०-४० वर्षांत माणसांत फक्त वरवरचे बदल झाले आहेत. जगामध्ये जे बदल झाले आहेत, ते सगळे बदल जगावेगळ्या माणसांनी केले आहेत.

 ‘सॉक्रेटिस' नावाच्या मोठ्या विद्वानाने जगामध्ये ज्ञानाची परंपरा निर्माण केली. खरे तर ज्ञानाची परंपरा ग्रीसमधून जन्मास आली. जगातील सगळी वस्तुनिष्ठ ज्ञानाची परंपरा ग्रीक संस्कृतीमधून जन्मास, उदयास आली आहे. सॉक्रेटिसच्या काळात धर्मसत्ता व राजसत्ता या दोन्ही अत्यंत बलवान होत्या. वर्तमानामध्ये भारतातसुद्धा या दोन सत्ता प्रबळ झालेल्या आहेत. सॉक्रेटिसच्या काळात धर्माची, कर्मकांडाची तत्त्वे, नियम होते. या काळात धर्मसत्ता व राजसत्ता मिळून राज्य करीत होत्या. सॉक्रेटिसची घडणच जोपर्यंत मला एखादी गोष्ट पटणार नाही, तोपर्यंत मी ती मान्य करणार नाही.' अशी झाली होती. त्यामुळे सॉक्रेटिसने धर्मसत्ता व राजसत्ता यांना आव्हान दिले. याचे प्रायश्चित्त म्हणून सॉक्रेटिसला विषाचा पेला देऊन ठार मारण्यात आले. सॉक्रेटिसचा दोष कोणता होता तर तो खरे व मनातील बोलत होता. सॉक्रेटिसच्या काळातील बहुसंख्य लोक मनातील काही बोलत नव्हते. आपण कधी स्वत:ला प्रश्न करीत नसल्याने दुस-याला प्रश्न करू शकत नाही. जी माणसं स्वत:वर प्रेम करतात, स्वत:ला समजून घेतात, स्वत:ला प्रश्न विचारतात, ती नेहमी सजग असतात. सॉक्रेटिसने कधीही बुद्धिप्रामाण्याशी प्रतारणा केली नाही. हा आपल्यातील व सॉक्रेटिसमधील मूलभूत फरक आहे.

सामाजिक विकासवेध/८४