पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचाराचं, नव्या आदर्शाचं बनवायचं असेल व कुटुंब संकल्पनेची नवी मांडणी करायची असेल त्या सर्वांना संस्थात्मक, एकात्मिक वंचितांची कुटुंबं अनुकरणीय ठरतील, असा अनुभवांती माझा विश्वास आहे.
कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे (उत्तरार्ध)

 वरील सारं विवेचन तुम्हाला वैचारिक, काल्पनिक, आदर्शासाठी केलेली रचना वाटेल म्हणून मी आमच्या संस्थेचंच उदाहरण देतो. आमच्या संस्थेचं हे उदाहरण अपवाद असलं तरी अनुकरणीय वाटतं. मी पुढे मोठा झाल्यावर महाराष्ट्रातील अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम, बालगृह चालविणाच्या संस्थांचा अध्यक्ष होतो. त्या काळात मी महाराष्ट्रातील अशा एकूण एक संस्था पहिल्या आहेत. थोड्याफार फरकाने कुटुंबभाव, मानलेली नाती, आप्तसंबंध तेथील लाभार्थ्यांच्या जीवनात संस्थाकाळास तयार होतात व पुढे औपचारिक, अनौपचारिकपणे आयुष्यभर चालत राहतात.
 माझा जन्म पंढरपूरच्या वा.बा. नवरंगे बालकाश्रमात सन १९५0 ला झाला. ती संस्था मुंबई प्रार्थना समाजातर्फे चालविली जायची. ती चालविण्यामागे फार मोठा मानवी दृष्टिकोन होता. समाजाने नाकारलेल्यांना स्वीकारायचं नि त्यांना 'माणूस' म्हणून परत समाजात सुस्थापित करायचं. संस्थेत असा कुठेच फलक नव्हता., ‘ही संस्था मातेचं कार्य करते'... पण प्रत्यक्षात ते व्हायचं. त्या संस्थेत कोण नव्हतं ? कुमारी माता, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, शिक्षा झालेल्या कैदी भगिनी, त्यांची मुलं, अपंग, मतिमंद, वेडे, अनाथ, निराधार, चुकलेली, सोडलेली, पळून आलेली मुलं, मुली, वृद्धा... कोण नव्हतं असं नाही. एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या वृद्धेपर्यंतच्या ३००-३५० मुले, मुली, महिलांचे कुटुंब. एक निपुत्रिक जोडपं होतं. ते सारी संस्था पाहायचं. जव्हेरे नाव. बाबा जव्हेरे नि ताई जव्हेरे, शिपाई, क्लार्क, स्वच्छक, लाकूडतोडा, माळी असा पुरुष स्टाफ; पण ते नोकर नव्हते. संस्थेतच राहायचे. आई-बाबा शिवाय, नाना, काका, अप्पा, मामा अशीच नावे त्यांची. मोठे झाल्यावर त्यांची खरी नावं कळली. हे सारे परत एकाच कुटुंबातील. त्यांच्या पिढ्या काम करायच्या. संस्थेत दवाखाना, शाळा, स्वयंपाकघर, शिवणक्लास, ग्रंथालय, खेळघर, कोठी, बालमंदिर सारं होतं. कुमारी माता यायच्या. सहा-सात महिने राहायच्या. बाळाला जन्म देऊन बाळ ठेवून निघून जायच्या. माझ्या समजेच्या गेल्या पन्नास वर्षांच्या प्रवासात हजारो कुमारी माता आल्या, गेल्या व समाजात पुन्हा संभावित, गर्या होऊन सुखाचं जीवन जगू लागल्या. त्यांची मुलं-मुली रामभरोसे जगायची.

सामाजिक विकासवेध/८०