पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसून येते. ही कुटुंबे एकच जात मानतात, ती म्हणजे 'मनुष्य'. यांचा एकच धर्म असतो, ‘मानवधर्म'. नातं एकच असतं, ‘माणुसकी'. त्या दृष्टीने हे कुटुंब पुरोगामीच म्हणावं लागेल. या कुटुंबाच्या तुलनेत समाजातील कुटुंब पारंपरिक ठरतात खरी ! विज्ञाननिष्ठा, समता, बंधुता ही या कुटुंबाची जीवनमूल्ये असतात. संधी देण्यावर, सुधारण्यावर, प्रयोगावर या कुटुंबांचा भर असल्याने इथे ‘सक्सेस स्टोरीज'चा कधी दुष्काळ असत नाही. ‘पॉझिटिव्ह रिझल्टस' अधिक ! येशु ख्रिस्ताचा उदार दृष्टिकोण हे या कुटुंबाचं तत्त्वज्ञान होऊन जातं, ते या कुटुंबाच्या कार्यपद्धतीमुळे. 'लेकरू अज्ञानी होतं, त्याला क्षमा करा' म्हणणारं हे कुटुंब सकारात्मक असतं. निषेधाला नकार व विधीला होकार ही इथली ‘बाय डिफॉल्ट सिस्टीम' असते.

 बुद्धाची चरमक्षमा शोधायची तर तुम्हाला याच कुटुंबाचं शरणागत व्हावं लागेल. करुणा व क्रौर्य यांचं अद्वैत या कुटुंबात आढळतं. क्रौर्य समाज करतं. संस्था करुणा देते ! पाप समाज करतो. पुण्य संस्थेच्या पदरी उपजत असतं. पापी माणसांची तुटलेली बेटं म्हणून निर्माण केलेल्या या संस्था ... पण त्या कोणी निर्माण केल्या याचाही विचार नव्या समाजरचनेच्या संदर्भाने व्हायला हवा. संस्थेत राहणारे बळी... त्यांचा काय दोष हेही एकदा संवेदनशीलतेनं समजून घ्यायला हवं. देव, दैव, कर्मफल, पाप-पुण्य, उच्च-नीचता, सवर्ण-अवर्ण, स्त्री-पुरुष अशांना थारा नसलेली ही कुटुंब अनुकरणीय नव्हेत का? इथं स्वार्थ नसतो. 'कर्मण्येधिकारस्ते मा फलेषु कदाचन' अशा निष्काम वृत्तीनं कर्तव्य पार पाडणारी ही कुटुंबं ! कबीर, कर्ण यांचे आदर्श, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रभृतींनी त्याग, समर्पण, ध्येय इत्यादींतून या कुटुंबांचा पाया रचला. समाजातून सर्व प्रकारची वंचितता हद्दपार करण्याचा विडा उचललेली ही कुटुंबे. यांच्याकडून समाजातील परंपरागत कुटुंबांना बरंच शिकता येण्यासारखं आहे. वर्तमान कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इत्यादींबद्दल पुनर्विचार, फेरमांडणी करायची झाल्यास संस्थात्मक, एकात्मिक, वंचित कुटुंबांना समजून घेतल्याशिवाय समाजपरीघ आपणास रुंदावता येणार नाही. संघर्षापेक्षा हे कुटुंब समझौता, समन्वय महत्त्वाचा मानते. कुणी आपल्या वाटेत काटे पसरले तर त्या जागी फुले पसरण्याचा उदारमतवाद ही या कुटुंबाची शिकवण होय. मनुवादाला छेद देत विशुद्ध मानवतावाद जोपासणारी ही कुटुंबं नवसमाज निर्माण करणारी ऊर्जाकेंद्रे होत. स्त्री-पुरुष भेद मिटवून माणुसकीची साद घालणारी ही कुटुंबे अधिक नैतिक, पारदर्शी होत. ज्यांना कुणाला आपलं कुटुंब नव्या शतकाचं, नव्या

सामाजिक विकासवेध/७९