पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे


 समाजात दोन प्रकारची माणसे राहतात. १) कुटुंब असलेली, २) कुटुंब नसलेली. कुटुंब असलेली माणसं स्थूल अर्थाने ज्याला आपण 'घर' म्हणतो तिथं राहतात. ती जन्मसंबंधांनी एकमेकांशी जोडलेली असतात. ती रक्तसंबंधांवर आधारित असतात. त्यात नाती असतात. आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण इ. यांचे वर्ग, जात, धर्म, वंश, परंपरागत संबंध विकसित होत असतात. यापेक्षा वेगळी माणसंपण समाजात राहत असतात. हे वेगळेपण समाजानं त्याच्या विवाह, जन्म, जात, धर्म, वंश, स्वरूपसंबंधी नैतिकता, परंपरा, रूढी, संबंध, नाती इ. दृष्टिकोनातून निर्माण केलेलं असतं. उदा. अनाथ, अनौरस, निराधार, बलात्कारित, कुमारी माता, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी आणि त्यांची अपत्ये, धरणग्रस्त, युद्धग्रस्त कुटुंब, बंदी बांधव (कैदी), वृद्ध, अपंग, मतिमंद, घटस्फोटित, परित्यत्या, एडस्ग्रस्त, तृतीयपंथी, दत्तक अपत्ये व त्यांचे कुटुंब... किती प्रकार सांगू? यांना रूढ अर्थाने आई, वडील, कुटुंब, घर सारं असतं; पण समाज हा परंपरामान्य संबंधावर उभा असल्याने समाज अमान्यांना नाकारलं जातं. मग ती मुलं, महिला, माणसं... माणसं असूनही संस्थात राहण्याची नामुष्की समाज त्यांच्या माथी मारतो. मग संस्था हेच त्यांचं घर, कुटुंब, नातं होतं व तिथे ती राहतात. असं कुटुंब नसलेल्यांचं एक कुटुंब... वंचितांचं कुटुंब तयार होतं. हेही अनेक प्रकारचे असतं. म्हणजे समाजातील अन्य घरांसारखं स्त्री, पुरुष, मुलं असलेलं. नुसतं मुलांचं, कधी नुसतं मुलींचं. तर कधी मुली, महिला, वृद्धांचं. कधी नुसतं युवकांचं. कधी नुसतं प्रौढांचं. कधी वृद्ध आजी-आजोबांचं, तर कधी चक्क एक दिवसाच्या बाळापासून ते १00 वर्षांच्या आजीआजोबांचंपण. ही कुटुंबे म्हणजे समाजानं नाकारलेल्या, उपेक्षिलेल्यांच्या संस्था होत. अर्भकालय, अनाथाश्रम, महिलाश्रम, रिमांड होम, वृद्धाश्रम, तुरुंग, आधारगृह, खुले तुरुंग, वसतिगृहे इथंही नाती असतात, पण मानलेली.

सामाजिक विकासवेध/७४