पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतो. त्यांचं बोलणं, वागणं, विचार करणं सारं थेट असतं. काळानं त्यांना न शिकता शिकण्याचं वरदान, ग्रेट भेट दिली आहे.
 माझ्या मुलांचीही ... त्यांच्या पिढीची म्हणा हवं तर, एक गोष्ट लक्षात आहे. आमची पिढी थेट काहीच शिकली नाही. साधी सायकलही आम्ही १० पैसे तासाने घेऊन शिकलो. त्या तासातही तीन-चार भागीदार असंत. साठ मिनिटं भागिले पार्टनर - त्यावर किती फे-या, वेळ ठरायची - पंक्चर झाली की भुर्दंड बसायचा. या साच्या दिव्यातही गंमत असायची. तीच गोष्ट स्कूटरची. ती विकत घ्यायची ठरल्यावर मोकळ्या मैदानात मित्रानी ती चालवायला शिकवली. मग लायसेन्सचे सोपस्कार. आधी लर्निंग. पर्मनंटच्या वेळी इंग्रजी ८ आकाराची फेरी काढता यायचं टेन्शन असायचं. आर.टी.ओ.ची भीती वाटायची. चारचाकी घेतली तर चक्क ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घालून इमानेइतबारे शिकलो अन् मग गाडी घेऊन रस्त्यावर आलो. या उलट मुलांची स्थिती. लूना, स्कूटर, मोटार ते न शिकता थेट चालवतात कसे याचेच मला राहन-राहन आश्चर्य वाटते. मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की, या थेट पिढीस कोणतीच गोष्ट शिकायला नेट लावायला लागत नाही. आमच्या तरुणपणी साधा क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळ पण आम्ही नेट लावून शिकलो. हा पिढीतील क्षमता, कौशल्याचा फरक की उपजत कौशल्याची घडण यावर एकदा संशोधन व्हायलाच हवे.
 नव्या पिढीस उपजत समृद्धी मिळाल्याचा हेवाभाव ईष्र्या, असूया माझ्या मनी अजिबात नाही. असेलच तर छोटी तक्रार. एवढा मोठा फूटबोर्ड मिळाल्यावर त्यांची हनुमान उडी सूर्य गिळण्याची का नाही? ती असायला हवी. संगणक तंत्रज्ञानाने काळ, काम, वेग यांचं आमच्या काळातलं त्रैराशिक खोटं ठरवलं. खरं सांगायचं तर संपुष्टात आणलं. त्यामुळे जीवनात गोष्टी कष्टसाध्य असतात हे तत्त्वज्ञानच झूठ ठरवलं. कट, पेस्ट, फॉरवर्ड, कॉपी, क्लिक, मेल, फेसबुकचं त्यांचं जग. माझ्या मित्राच्या मुलाने इंटरनेटवर मैत्री करीत हाँगकाँगची मैत्रीण पत्नी म्हणून न पाहता, भेटता घरी आणली तेव्हा माझ्या मनातला माझ्या पिढीचा सारा अहंकार गळून पडला अन् लक्षात आलं. या पिढीनं काही हरवलं असेल, गमावलं असेल; पण कमावलंही तेवढंच, त्यांना जे गवसलं, सहज उपजत त्याचं अप्रूप नि कौतुकही मोठं वाटतं अन् लक्षात येतं, काळाला दोन खिसे असतात. एक फाटका असतो, दुसरा धड. फाटक्या खिशातून कालबाह्य हरवत राहतं. धड खिशात गवसलेलं, उपयुक्त साठत राहतं. काळ चूझी खराच!

सामाजिक विकासवेध/६९