पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाने ‘भौतिक ऐश्वर्य म्हणजेच जीवन' असा समज करून घेतला की त्या समाजाचा विकास कुंठित झाला असे समजावे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही जर आपली घटनामान्य मूल्ये असतील, समाजवादी समाजरचना हे जर आपले ध्येय असेल तर आपला विकासाचा नकाशा हा सर्वसमावेशक असायला हवा. 'सर्वजन सुखाय' हे 'बहुजन सुखाय'चे उन्नत रूप होय. त्यामुळे जात, धर्म, लिंगाधारित विषमतेइतकीच विविध प्रकारची समाजवंचितता महत्त्वाची. ज्यांना अद्याप विकासाची फळे चाखायला मिळाली नाहीत, त्यांना ती अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे, तसे सामाजिक न्यायाच्या प्राधान्यतत्त्वानुसार ते अनिवार्यही ठरते. म्हणून मग वर्तमान समाजाचे विश्लेषण विद्यमान बदलाच्या पार्श्वभूमीवर करणेच दूरदर्शीपणाचे ठरते. प्रश्नाकडे डोळेझाक करण्याने प्रश्नाचे गांभीर्य वाढत जाऊन समस्या अधिक गुंतागुंतीची होत राहते, याचे राजकीय चित्र आपण काश्मीरच्या प्रश्नात पाहतो आहोत. तसेच ते वर्तमान पटेल, मराठा समाज आंदोलनांतही दिसते. परिवर्तित प्रश्न सोडविण्याचे मार्ग पुरातन कधीच असत नाहीत. त्याग, समर्पण, वर्जन, आरक्षण, समावेशन असे अनेकविध उपाय आजमावूनच आपणास समाजाच्या आकांक्षा नि अपेक्षांची तोंडमिळवणी करावी लागते. जपान, अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांत आपल्यासारखेच प्रश्न व समस्या होत्या. त्या त्यांनी कशा सोडविल्या, हे पाहणे अनुकरणीय होईल.
 ‘सामाजिक विकासवेध' हा सन २०१३ ते २०१७ या गेल्या तीनचार वर्षांत लिहिलेल्या विविध सामाजिक लेखांचा संग्रह होय. हे लेख मी वेळोवेळी विविध दैनिके, मासिके, वार्षिके (दिवाळी अंक) यांसाठी केलेले लेखन होय. ते ज्या क्रमाने प्रसिद्ध झाले, त्या क्रमानेच या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे कालसंगती आपसूक साधली गेली आहे. या तीस लेखांत विषय व प्रश्नवैविध्य आहे. त्यातून आपोआपच एक समाजसमग्रता निर्माण झाली आहे. दलित, वंचित, स्त्रिया, शेतकरी, युवक, वयोश्रेष्ठ यांचे प्रश्न व समस्या आहेतच. शिवाय समाजाचे सार्वत्रिक प्रश्नही यात आहेत. म्हणजे भारत भौतिकसंपन्न झाला; पण तो चरित्रसंपन्न झाला का? राष्ट्रीय कर्तव्याचे त्याला भान आहे का? कायदापालनाचा संस्कार येथील शिक्षणाने त्याला दिला का? येथील शिक्षण जबाबदार नागरिकांची घडण करते का? येथील कार्यसंस्कृती काय? आपले राजकीय चरित्र काय सांगते ? हे नि असे अनेक प्रश्न आपणापुढे आहेत. ते सोडवायला, सुटायला मदत व्हावी, या उद्देशाने केलेले हे लेखन होय. ते