पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वकील, डॉक्टरांच्या घरी. कमिटी, बँक, व्यापारी पेढीवर ते मिळायचं. सार्वजनिक वाचनालयात एक वर्तमानपत्र एकावेळी चक्क तीन-चार लोक वाचायचे. पुढचं पान एक वाचायचा. त्याच्या मागचं पान दुसरा ... मधलं पान तिसरा. वर्तमानपत्र दोन-तीन पानांचंच असायचं. मासिकं वाचायला तिष्ठत बसावं लागायचं. खासगी ग्रंथालयं नव्हती. होती फिरती वाचनालयं. माणूस घरोघरी पुस्तकं, मासिकं ठरावीक वारी घेऊन यायचा.
 रात्री वाचणं दिव्य असायचं. दिवेलागण म्हणजे वाचन बंद अशीच स्थिती. सुरुवातीस घरोघरी म्हणे मशाली, पलिते अडकवलेले असायचे. माझा जन्म दिव्या, कंदिलाच्या काळातला. मी वाचू लागलो ते दिव्यावर. दोन पैशांची वातीची जस्ताची चिमणी बाजारा दिवशीच विकत मिळायची. मग वात विकत आणायची. मग रॉकेल, कधी रॉकेल नसायचं, तर कधी वात. धूर ओकणारी जस्ताची चिमणी सारं घर, कोनाडे काळवंडून टाकायची. तिच्यात वाचणं दिव्य असायचं खरं. एका चिमणीमध्ये व भोवताली सारी वाडी, वस्ती वा वाड्यातील मुलं घेरून मांडीला मांडी लावून वाचत, लिहीत बसायची. वाचायचे म्हणजे डोळे फाडून घेणे असायचे.
 मग आले काचेचे दिवे. वातीच्या ज्योतीभोवती काच आल्याने ज्योतीचं वाच्याबरोबर नाचणं, भडकणं, विझणं संपलं अन् प्रकाशाचं कमी-जास्त होणंही ! नियमित, स्थिर प्रकाशात वाचण्याचा आनंद म्हणजे नव्या सुखाचा शोधच होता, हे आजच्या पिढीला सांगूनही कळणार नाही. दिव्याच्या काचेवर काजळी धरून काच काळवंडायची. रोज दिवा लावण्यापूर्वी काच साफ, स्वच्छ करण्याचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला; पण त्यात वाचंण म्हणजे श्रीमंती थाट असायचा.

 काचेच्या दिव्यांची जागा मग कंदिलानं घेतली. कंदील म्हणजे मोठा काचेचा दिवाच. भरपूर उजेड. शिवाय रात्री प्रवासात, शेतात राखणीला, येता-जाता पायांखाली दिसणं आलं. साप, विंचवावर पाय ठेवणं सुटलं. वाट पायाखाली आली. ठेच, ठेचकाळणं संपलं. रात्रभर लिहिणं, वाचणं शक्य झालं. शिवाय प्रकाश कमी-जास्त करण्याची युक्ती म्हणजे केवढी मोठी सुधारणा, शोध, सोय वाटायची म्हणून सांगू! एखादी बाबूराव अर्नाळकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकरांची कादंबरी रात्रीच्या बोलीनं मित्रमैत्रिणीकडून मिळायची. रात्रीत तिचा फडशा पाडायचा. एक्साइटमेंट, थरार... त्याला भुतासारखं वाचन म्हणायचो आम्ही... घोस्ट रीडिंग. त्यात बाबूराव अर्नाळकरांची कादंबरी. त्यातला नायक झुंजार म्हणजे भय, जिज्ञासा, गारुड सर्व एकाच वेळी ... शिवाय भिंतीवर पडलेल्या आपल्याच लांब

सामाजिक विकासवेध/६५