पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं, त्यात मोठं तथ्य आहे. सार्वजनिक जीवनात दुस-याचा विचार प्रथम करणं, सहनागरिकांचं भान ठेवणं, त्यांना प्राधान्य देण्याची मानसिकता ठेवणं म्हणजे त्यांचा आदर करणं असा आचार आपण कटाक्षाने करायला हवा. सार्वजनिक ठिकाणी शांतता पाळणं, आदळ, आपट, मस्ती, खिदळणं होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे नागरी सभ्यता व संस्कृती. घरं आणि शाळांनी यात मोठी गुंतवणूक, प्रयत्न करणं आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. अन्य करतात ... मी एकटा करून काय जग बदलणार ?' या धारणेतूनही आपण मुक्त व्हायला हवं. ‘जग कसंही वागू दे, मी सभ्यता, शिस्त, संयम सोडणार नाही', अशी वैयक्तिक प्रतिबद्धता व नैतिकताच उद्याच्या बदलाचा प्रारंभ म्हणून प्रत्येक वागेल तो सुदिन !
 भारतीय समाज उभारणीसाठी दुहेरी वागणं टाळणे, भ्रष्टाचार न करणे, पारदर्शी वर्तन, वेळेचे नियोजन व पालन, सार्वजनिक व्यवहारात शिस्त व संयम, अन्यांचा आदर, कायदा पालन, कर भरण्यातील कटाक्ष, जात, धर्म, लिंग भेद मुक्त व्यवहार व जीवनपद्धती, स्त्री-पुरुष समान व्यवहार व मानसिकता, चंगळवादी वृत्ती टाळणे, कर्जबाजारी वृत्तीचा त्याग, स्वकष्टार्जित कमाईस प्रतिष्ठा, भ्रष्टास अमान्यता अशा गोष्टींतूनच भारतीय समाज जबाबदार बनविणे शक्य आहे.

 भारतीय नागरी समाजविकासातला एक भाग आपला शासकीय कारभार आहे. दप्तर दिरंगाई, लाच, कागदपत्रे गहाळ होणे, न्यायव्यवस्थेची ढासळत जाणारी प्रतिमा, पोलीस खात्यावरील अविश्वास यांच्या दोषांचे सारे खापर शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींवर फोडून जनतेस नामानिराळे राहता येणार नाही. टाळी एका हाताने वाजत नसते. वरील साच्या दोषांचा पूर्वार्ध जनता आहे, नागरिक आहेत. तलाठी पैसे घेतल्याशिवाय सातबारा उतारा देत नाही. तुम्ही रीतसर अर्ज करा. शुल्क भरा. पोहोच घ्या. नियमानुसार वेळेपर्यंत थांबा. न मिळाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करा. माहिती अधिकाराचा वापर करा. संयम ठेवा. शिस्त पाळा. तलाठी दाखला देईल. न देऊन तो काय करील ? त्यालाही नोकरी करायची आहे. तुम्ही गैर मागणी करू नका. अवाजवी नोंदीचा आग्रह धरू नका. ‘सरकारी काम, सहा महिने थांब' हे आपलं चरित्र बदलू शकेल, ते आपण बदलल्यावरच. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करा. प्रश्न लावून धरा. ताणा, पण तुटू देऊ नका. तीच गोष्ट पोलिसांची. जे लोकप्रतिनिधी भ्रष्ट वाटतात, त्यांना समारंभास बोलवून सन्मान करू नका. अशांवर जाहीर समाज बहिष्काराचे (अघोषित) पथ्य पाळा. अशांकडे काम घेऊन जाऊ नका.

सामाजिक विकासवेध/५९