पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिक केले आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था विभक्तपणाकडे वळल्याने, शिवाय ती नगरमुखी झाल्याने नवी मुले उपजत प्रौढ आहेत. ती तंत्रकुशल आहेत. संपर्क, संवाद, दळणवळण सर्व प्रकारच्या साधनांत तरबेज पिढीस बालकहक्कांचे वरदान या शतकाने बहाल केले आहे. नागरी व ग्रामीण मुलांचे जीवनमान व जाणिवांचे जग यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तरी पूर्वीची मुले व आजची मुले यांत महदंतर आहे. ती धीट, धाडसी, बोलकी आहेत. आविष्कार व अभिव्यक्तीचे खुले व्यासपीठ त्यांना लवकर लाभत असल्याने ती मत व्यक्त करताना दिसतात. त्यांचे ऐकणे काळाची गरज होऊन बसली आहे. मुलांचे कायदे क्षणिक उद्रेकापोटी बदलण्यात हाशिल नसते, हे केव्हातरी आपण समजून घ्यायला हवे. त्या दृष्टीने सन २०१३ च्या दरम्यान भारतात केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर बालके, युवक, महिला व वयोश्रेष्ठ नागरिक यांचे धोरण व योजना बनवित असताना त्यांचा सदस्य कार्यकर्ता म्हणून मला भारतीय समाजातील होत असणारे बदल, परिवर्तने, शासकीय धोरण व योजना यांची संगत व मेळ घालताना लक्षात आलेली गोष्ट अशी की आपण स्वप्नरंजने मोठी करतो; पण आर्थिक तरतुदीविषयक आपली अनुदारता ही येथील सामाजिक बदलांतील मोठा अडथळा व अडसर आहे. राजकीय इच्छाशक्ती ही लोकशाही शासनव्यवस्थेतील दूरगामी परिणाम करणारा घटक असतो. राजकर्ते, मग भले ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत लोकानुरंजन ही त्यांची मजबुरी असल्याने ते हितवर्धकपेक्षा लोकप्रिय निर्णयाकडे निरंतर झुकलेले राहतात. परिणामी इथे मूलभूत बदल अपवादाने होतात. भारतीय समाजाचा विकासवेध घेताना हे जे वास्तव पुढे येते, तिथे आपल्या परिवर्तन व पुरोगामी विकासाला खीळ बसते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. हा लेखनप्रपंच खरे तर तशा प्रगल्भ समाजघडणीच्या ध्यास व ध्येयातून केलेला खटाटोप होय.
 भारतीय समाज निर्माणकाळापासूनच बहुवंशीय, बहुसांस्कृतिक राहिला आहे. अशा समाजातील समस्या गुंतागुंतीच्या असतात, हे खरेच आहे; पण ते सोडवायचे उपाय मात्र व्यामिश्र करून चालत नाहीत. प्रश्नांचा निरास करणाच्या कल्पनांमध्ये स्पष्टता नसेल तर ‘धरले तर चावते, सोडले तर पळते' अशी स्थिती होऊन जाते. परंपरा जपत आधुनिक होता येत नसते. या दोन्हींचा प्रवासच उपजत उलट दिशांचा असतो. आपण प्रतिगामी राहायचे का पुरोगामी व्हायचे हे ठरवावेच लागते. 'गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास' अशा मनोवृत्तीने समाज स्थितिशील बनून रहातो. विशेषतः शिक्षणाने आधुनिक व भौतिकदृष्ट्या संपन्न होऊ पाहणा-या