पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शाळेत वेगवेगळ्या कृतींतून समूहजीवनाचे धडे गिरविले, शिकविले जातात व समाजजीवनात ते पाळण्यावर कटाक्ष असतो. आई-वडील तो पाळतात. मुलं त्यांचं अनुकरण करतात. आपल्याकडे आई-वडिलांनी शिकण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत. 'खोटं बोलू नये' असं शिकविण्यापेक्षा खोटं न बोलण्याची जाणीवपूर्वक काळजी घेणं. ‘दुटप्पी न वागणं' या एका व्यवहारात आपण कितीदा नापास होऊ ? असा नुसता विचार केला तरी मोठी यादी तयार होऊ शकते. ‘ओळ' हा एक छोटा संस्कार लक्षात घेतला तर लक्षात येईल की, लागणारी बस पन्नास प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असणारी आहे. जाणारे प्रवासी दहा-पंधराच आहेत तरी आपण रेटारेटी करत कां चढतो हे मला न उमगलेलं कोडं आहे. संयम, विवेक, विचार, तर्क इत्यादींचा अभाव हेच त्याचं कारण. रेटारेटी, घुसणं यात शहाणं, अडाणी असा भेद नसतो हे विशेष ! बसमध्ये बसल्यावर साहित्य ठेवून जागा अडवणं, सहप्रवाशाचं वर्तमानपत्र वाचायला मागणं, सीटवर पाय ठेवणं, वृद्ध, अपंग, माता-बालक पाहून दुर्लक्ष करणं या साच्या आपल्या नागरिकत्व नसल्याचा आणि खरं तर माणूसपण नसलेल्याच खुणा नाहीत कां ?
 रहदारीचे नियम न पाळण्यात आपण कायदेभंग करतो याचं भान नसणं केवळ अक्षम्य ! रहदारी पोलिसाशी हुज्जत घालणं हा अडाणीपणा ना ? दुचाकीवर तीन लोकांनी स्वार होणं यात कमीपणा न वाटणं याला काय म्हणावं ? दंड भरणे, कर भरणे, पार्किंग फी भरणे कटाक्षाने नको का करायला ? एकमेकांचा आदर, एकमेकांना साहाय्य, हा सामाजिक आचारधर्म व्हायला हवा. अपघातात सामान्य माणूस मदत करीत नाही त्याचं खरं कारण आपल्या पोलिसांचा उलटा व्यवहार, वर्दी देणा-याला अपराधी ठरविण्याची त्यांची संस्कृती सामान्य माणसास तिन्हाईत बनविते. शिवाय ‘कायद्यापुढे सारे समान' याची प्रचिती व्यवहारात न येणंही आपल्या कायदाभंगाचं एक कारण आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे कायदा, कर, दंड, शिस्त यांना फाटा हे समीकरण बदलायला हवं. पूर्वी बसमध्ये आमदार भेटत. आता हे चित्रच राहिलं नाही. लोकप्रतिनिधींचा व्यवहार हा सार्वजनिक जीवनाचा आदर्श मानायचा झाला तर आपल्याकडे त्याची गोचीच आहे. आगापिछा नसलेली माणसंच नियम पाळतात, दंड भरतात. त्यातून समाजजीवनात काय संदेश जातो?

 आपले सार्वजनिक समारंभ वेळेवर सुरू होत नाहीत याचं कारण प्रेक्षकांचं वेळेवर न येणं यापेक्षा पाहणे वेळेवर न येणं, संयोजकांचा वेळेवर कार्यक्रम सुरू न करण्याकडे कल (वेळेत पूर्वतयारी न होणं) अशी अनेक

सामाजिक विकासवेध/५७