पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या सर्व प्रक्रिया उपक्रम, संवाद, सहभागातून बालक दिनाच्या निमित्ताने शासन, समाज, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ‘बालकविषयक आचार संहिता' सुचवावीशी वाटते, ती अशी -
१. मुलांना जन्म देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.
२. मुलांना जन्म द्यायचा ठरल्यावर त्यांच्या भविष्याचे नियोजन करून त्यांना जन्म द्या.
३. मुलांची काळजी जन्मापूर्वीही ती गर्भात असतानाही घ्या.
४. गरोदर मातेच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याची काळजी घ्या.
५. बाळंतपूर्व चिकित्सा, उपचार, आहार, पोषण महत्त्वाचे माना.
६. जन्मजात बालकांच्या औषधोपचार, लसीकरण, स्तनपानाची काळजी घ्या .
७. मुलांच्या वाढीबरोबर त्यांचे सामाजीकरण होईल असे पहा.
८. वाढत्या वयात मुलांचे ऐका, त्यांना बोलू नका.
९. मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना विचारण्यास प्रोत्साहन द्या. त्यांच्या प्रश्नांना बगल देणारी उत्तरे देऊ नका. उत्तरे वस्तुनिष्ठ, व्यवहारी, वैज्ञानिक द्या.
१०. वाढत्या वयात मुलांमध्ये जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत, भेद रुजवू नका. त्यांना व्यापक, उदार, सहिष्णू, परहितदक्षतेचे संस्कार द्या.
११. देव, दैव, भूत, खेत, प्रेत यापासून मुलांना दूर ठेवून त्यांना श्रम, स्वावलंबन, सदाचार, प्रामाणिकपणा स्वत:च्या आचारणातून शिकवा.
१२. घरात आई-वडील, नातलग, भावंडे यात सुसंवाद, आदर, प्रतिष्ठा इत्यादींची जपणूक म्हणजेच समाजशील देशनिर्मितीचा पाया माना.
१३. स्वातंत्र्य, समता, बंधुता, जाती-धर्म निरपेक्षता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा ही जीवनमूल्ये प्रमाण मानून मुलांची घडण करा.
१४. मुला-मुलींच्या आहार, आरोग्य, शिक्षण, संधी, सुविधात भेदभाव करू नका.
१५. मुले-मुली तुमचीच असली तरी लाडाबरोबर जबाबदारीचा पासंग ठेवाल तर मुले तुमची होतील, तुमच्या हाती लागतील व तुमच्या वृद्धापकाळात तुम्हास हात देतील.

◼◼

सामाजिक विकासवेध/४३