पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अलीकडे मी मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रांत अॅड्स वाचतो. Wanted Evening Companionship, Escorts ! Do you want? शरीरसंबंध - माणसाचे नि प्राण्यांचे यांत मूलभूत अंतर आहे. प्राण्याला आपण काय, कुणाशी करतो याचं भान, जाणीव नसते! म्हणून तर तो प्राणी ना? मनुष्य म्हणजे विचार, सारासार, नैतिकता, विवेक, विधिनिषेध सारं सारं! शिकणं म्हणजे समजदार होणं! अलीकडे शिकणं म्हणजे शेफारणं असा काहीसा अर्थ रूढ होऊ पाहतो आहे. स्थळ, काळ, काम, वेग या सा-यांचं एक टायमिंग नि टाईप ठरलेला आहे. तो काळाबरोबर बदलत असतो, पण काही गोष्टी काळापुढे नेणं म्हणजे घाई... नेई खाई!
 लग्न आणि स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. व्यक्तीस्वातंत्र्याचा नि लग्नाचा घनिष्ठ संबंध आहे; पण त्याचा एक तिसरा कोन आहे समाज. स्त्री-पुरुष हे काही बेटावर राहत नाहीत. स्त्रियांचं बेट वेगळं अन् पुरुषांचं वेगळं असं काही अतिरेकी स्त्रीवादी म्हणत! तो काळ विसाव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांचा होता खरा! आता परत आपण माणूस नावाच्या बेटाकडे प्रवास करू मागतो आहोत. स्त्री ही माणूस आहे. स्त्री-पुरुषांच्या समभावाशिवाय दोन्ही आधे-अधुरे! पूर्ण-अपूर्णाच्या द्वंद्वाचाही काळ आता इतिहासजमा होईल! ‘मी नि माझं'ची मजा चाखून झाली. एकटा, एकटी राहून झालं. “अंधेरे बंद कमरे में आयुष्य नाही काढता येत. बंद दरवाजांची घरं माणूसच नाही थोपवत. माणुसकीपण थोपवत असतात. तेरी भी चूप और मेरी भी... आपण स्मशानात रहातो कळल्यावर हास्यक्लब उदयिले ! रामदेवबाबांनी काही नाही केलं तरी स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष वेधलं ! महानगरी माणसं पैशांच्या गुर्मीत जगत. आता त्यांना एस.एम.एस. पाठवून, शुभेच्छा देऊन, कुशलक्षेम कळवून जगता येत नाही कळलं. आता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा शोधते झालेत. पहिले एकटेच प्रभातफेरीवर निघायचे. आता जथ्थेच्या जथ्थे, थवेच्या थवे यंग सीनिअर्सचे ! म्हाताच्याला आलं बाळसं असा सारा नवोत्साह ! अॅडिडास बूट, टी-शर्ट, कॅप, सँक, शॉट अन् तिकडे पंप शू, चुडीदार, जीन्स, गॉगल्स... मृत्युंजयी जीवन ! जय पेन्शन ! एनआरआय झिंदाबाद !! असा सर्वत्र माहौल.

 जीवन सरकता रंगमंच असतो. काळ गुजरेल तशी दृश्यं, पात्रं, प्रसंग, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन, ट्रिक्स, टेक्निक्स बदलत असतात. बघता-बघता पहिलं दृश्य ओझरतं. नवं झुंजूमुंजू दिसू लागतं ... भगाटतं ... जुनी पात्रं

सामाजिक विकासवेध/२८