पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोरा-पोरींना ते नटून आणायला विसरत नाहीत. पै-पाहुण्यांशी बोलणं अंमळ प्रेमाचं नि सबुरीचं. जिभेवर साखर. वागण्यात नव्वद अंशांचा काटकोन तीस अंशाचा. कधी कधी तर शून्य अंश होऊन पायधरणीसुद्धा! प्रत्येकाचं लग्नातील कर्तव्य, उद्देश, उपस्थिती, वावर पाहण्यासारखा असतो!
 याला लग्न का म्हणतात तेच मला कळत नाही. हा शब्द आपण जसा घुटमळून लिहितो ना तसंच असतं लग्न ! एकेकाळी लग्न म्हणे दोन गरोदर बायकांचीच व्हायची. मुलगा-मुलगी झाली तर ठीक नाही तर आपोआप तलाक, काय ग्रेट होते हो आपले पूर्वज ! मग सुधारणा झाली. मुलं-मुली झाली की ठरवून विवाह होऊ लागले, ते मुला-मुलींना कळण्याआधीच ! म्हणजे असं की अंगणा-सोप्यात पोरं भातुलकीचा खेळ करू लागली किंवा नवरा-नवरी खेळू लागली की आई-वडिलांच्या मनात तो खेळ जिवंत करायचा संचार व्हायचा. द्यायचे बार उडवून. नवरी इतकी लहान असायची की, मामा कडेकर बसूनच तिला मांडवात आणायचा. नवरा इतका छोटा असायचा की काकाच्या खांद्यावर बसून त्याचं डोकं धरून बसायचा (आणि नंतर मग डोक्यावरच बसायचा!) आत्ता नवरानवरी इतके मोठे झालेले असतात तरी मामाचा उत्साह मात्र तोच! भाचीला दिलं नाही ना? उचलतोच असा सारा पोरखेळ! त्यात आता हार घालण्यावरून वाढत चाललेली ईर्ष्या तर नवरा-नवरीचा चेंदामेंदा करू लागलीय!

 पूर्वी कळायच्या आधी लग्न व्हायचं! आता कळून उलटलं तरी लग्न वळता वळत नाही. मुलं-मुली शिकत राहतात. रोज शिक्षणाचं तोरण झोक्यासारखं उंच जातंय! पोस्ट-ग्रॅज्युएट झालंच पाहिजे. करिअरमध्ये पर्मनंट झाल्याशिवाय नो लग्न! मग बघा-बघीत शादी डॉट कॉमवर प्रोफाइल, बायोडाटा, अॅड्स, मग प्रपोज करायचं. चॅटिंग, डेटिंगशिवाय नो सिग्नल. तोपर्यंत आख्खा दहा वर्षांचा पूर्ण बहार निघून जातो. स्वप्नामागून स्वप्नं पाहत रात्रीच्या रात्री बिननिजेच्या आणि भिजेच्या ! नोकरी डॉट कॉम होतं तोपर्यंत सारं आलबेल होतं. हे शादी डॉट कॉम प्रकरण जरा दमछाक करणारंच ठरू लागलंय. ‘पहले नोकरी, बाद में छोकरी' ठीक होतं. आता दिवस गेल्यावर पळापळ. काही खरं नाही. विवाह हे बंधन होता कामा नये. ते असायला हवं कर्तव्य! कर्तव्य म्हणजे जबाबदारी! जबाबदारी म्हणजे खबरदारी! खबरदारी का दूसरा नाम सबुरी! श्रद्धा और सबुरी जीवनातपण हवी. विवाहाकडे कर्तव्य म्हणून पहा. जीवन तुम्हाला इंद्रधनुष्याचे सात रंग दाखवील!

सामजिक विकासवेध/२७