पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाष्टा. दुपारी उरलेलं जेवण स्वाहा व्हायचं. जोडी घरी जाताना ८५0 रुपये रोज घेऊन जायची. चुकून नवरा निर्व्यसनी होता. म्हणाला, “साहेब, गावाकडे शेत, घर, विहीर, जनावरं समदं हाय. पावसाळ्यात शेती करतो. पाऊस संपला की मजुरी. जानेवारी ते मार्च भावकी, जत्रा, लग्नं समदं असतं. तीन-तीन महिन्यांच्या पाळ्या पाळतो. आमच्या वस्तीचा पंचबी मीच हाय. मोबाईलवरून गाव चालवतो.
 बाळ नावाचा माझा भाचा आहे. एस. एस. सी. पास. गेली पंचवीस वर्षे एका हॉस्पिटलमध्ये क्लार्क होता. २0,000/- पगार होता. ग्लोबलायझेशनमध्ये हॉस्पिटल टेकओव्हर झालं. नव्या मॅनेजमेंटने त्याला घेतलं नाही कारण त्याला इंग्रजी व कॉम्प्युटर येत नाही. आजवर प्रामाणिकपणा हे त्याच्या जगण्याचं भांडवल होतं. आता मूल्य' संपलं. 'किंमत' महत्त्वाची ठरू लागली. 'किमती'चा आधार ‘कौशल्य' ठरू लागलं आहे, शिक्षण नाही.
 माझा लहान मुलगा तीन महिने कामावर असतो, तीन महिने घरी. त्या पाथरवटासारखाच. तीन महिने तो दिवसरात्र ऑन ड्यूटी असतो. घरी आला की तीन महिने फक्त इश्शी, मम्म, जई (खाणं, पिणं, झोपणं) करतो. (पीत नाही हं!) तो जे मिळवतो ते सांगून खरं वाटणार नाही, म्हणून सांगत नाही. मिळकतीवर एक पैसा टॅक्स नाही. मिळकतीचा एक पैसा मिळकतीच्या काळात खर्च नाही. नेट सेव्हिंग... फक्त शेव्हिंगलाही वेळ मिळत नाही। इतकच.

 असं बदलणारं जग समजून घेणारे तरतील... बाकी सारे तरंगत राहतील. कोणी स्वप्नांच्या दुनियेत... कोणी रेसचे घोडे होण्याच्या धुंदीत... जे जमिनीवर पाय ठेवून कष्ट करतील तेच उद्याचे किमयागार ठरतील. सहज आठवलं म्हणून सांगतो... बाटा कंपनीचा मूळ मालक रस्त्याकडेला बसणारा, बूट शिवणारा चांभार होता म्हणणे! त्याची कंपनी जगभर पसरल्यावर बाटा इंटरनॅशनल, अँड, मल्टिनॅशनल कंपनी झाल्यावर त्याला विचारलं होतं, '... तुझ्या यशाचे रहस्य काय?' त्यानं उत्तर दिलं होतं, 'मी माझी नजर सतत रस्त्यावरच्या पायांवर ठेवतो. ज्याची नजर जमिनीवर असते तोच आकाश कवेत घेऊ शकतो. अन् मला मग अर्जुन आठवतो... मत्स्यभेद करणारा... त्याला फक्त माशाचा डोळाच दिसायचा. अभिनव बिंद्राला फक्त म्हणे ‘बुल' (टार्गेट) दिसायचं ! असं लक्ष्यभेद करणारेच ‘मुकद्दर का सिकंदर' होतात... तुम्ही ठरवा... तुम्हाला रेसचा घोडा होऊन जीवनाचा जुगार खेळायचा आहे की कष्टानं दगडाला पाझर फोडून स्वेदगंगेनं...

सामाजिक विकासवेध/१९