पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सन १९७०-८0 चा काळ हा बँकिंग, डॉक्टर, इंजिनिअर्स होण्याचा. सन १९८०-९० ला आय.टी., इंजिनिअरिंग, मेडिकल फॉर्मात होतं. सन २000 ला स्पर्धा परीक्षांची क्रेझ वाढली. आज नवी पिढी या साच्या क्रे झमधील झिंग उतरवून जमिनीवर पाय ठेवत स्वतः करिअर ठरवते, हे माझ्या दृष्टीनं जास्त समजदारीचं, शहाणपणाचं वाटू लागलंय. पालक मदतनीस, मार्गदर्शक होताहेत, मित्र होताहेत हेही मला अधिक सकारात्मक, आश्वासक वाटतंय!
 या रिझल्ट, परीक्षा, शिक्षण इत्यादी संदर्भात आजच्या तारखेला मी विचार करतो तेव्हा कष्टाची कामं करून वर येणारे उद्याचे जनक होणार असं का वाटू लागलंय कोण जाणे. पण आतला आवाज मला वर्तमान शिक्षणाच्या वैभवीकरणाचे (Glorification) वैयर्थ, व्यर्थपण प्रकर्षानं, प्रभावानं समजून देऊ लागले आहे. माझ्या घरासमोर गेली १० वर्षे एक पत्र्याची शेड होती. तिथे पारंपरिक कुंभार कुटुंब गणपतीचा कारखाना चालवायचं. मे ते ऑगस्ट, सप्टेंबर असे जेमतेम पाच-सहा महिने कारखाना चालायचा. मे, जून, जुलै मूत्र्या ओतल्या जायच्या. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये रंगकाम, पॅकिंग, डिपॅच, सेल, मे ते जुलै कुंभारकाका एकटेच काम करायचे. ऑगस्टमध्ये सारं घर म्हणजे पत्नी व दोन मुलं (मुलगा/मुलगी) रंगवायचं काम दिवसरात्र करायचे. या वर्षी शेड काढली म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की कुंभारकाकांनी स्वत:चं घर बांधलं. शेजारीच शेड मारली आहे. कारखाना, घर स्वत:चं ! मुलांना शिक्षण, लग्नासाठी फिक्स डिपॉझिटस् केल्यात. कुंभारकाका सांगत होते, “सर, जगायला फक्त तीनच गोष्टी लागतात. १) रुपये, आणे, पैसे ओळखता आले पाहिजेत. २) ते मिळवता आले पाहिजेत. ३) खर्च करायची अक्कल आली की झालं.' कुंभारकाका ९ वी नापास झाले नि त्यांनी शिक्षण सोडलं.

 माझ्या घरासमोर नगरोत्थान योजनेतून रस्ता करायचं काम सुरू होतं. मी काम करणा-यांशी बोलत राहायचो. इंजिनिअर साहेब यायचे. साईट इंजिनिअर. त्यांना पगार होता रु. ७000/- म्हणजे साधारणपणे २५0 रोज. रस्त्यावर पसरायला खडी करण्यासाठी डंपर फाडी उतरवायचा. एक डंपर फाडी (मोठे दगड) नवरा-बायकोची जोडी फोडून दिवसात फडशा पाडायची. सकाळी सूर्योदय ते सायंकाळी सूर्यास्त अशी अविश्रांत कामाची वेळ. शेजारच्या झाडाच्या सावलीत मूल झोपलेलं... झाकलेलं... खडी पडून लागू नये म्हणून. आई मूल पाजताना मिळेल तितकीच विश्रांती घ्यायची. बाप पाणी पिताना मिळेल तितकीच. सकाळी जेवण म्हणजेच

सामजिक विकासवेध/१८