पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी पात्र ठरतो, असे प्रत्येकास वाटायला हवे. मी असेन एकसंख्य. मला नाही पर्वा कुणाची. जग कसेही असो, मी हा असा, असे म्हणत रोज वागणे, व्यवहार करणे यातूनच समाज बदलत असतो. शांत क्रांतीच्या पाऊलखुणा मित्रांनो, रस्त्यांवर कधीच उमटत नसतात, त्या हृदयावर कोरल्या जातात. मग माणसे नतमस्तक होत अनुयायी होतात, अनुकरण करतात. आचारसातत्य महात्मता निर्माण करते, यावर तुमचा विश्वास हवा आणि कृतिसातत्याचा पाठपुरावाच जगाला नोंद घेण्यास भाग पाडत असतो. मी नवी वाट मळणार. परिवर्तनाचा मी वाटसरू बनेन. एक दिवस त्याची दिंडी निघाल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास निर्धारच कारवाँ, वारी घडवत असतो.
 इस सड़क पर इस कदर कीचड बिछी है,
 हर किसी का पाँव, घुटनों तक सना है।
 सांगणारे हिंदी गझलकार दुष्यन्तकुमार आपणास हे सांगायला विसरत नाहीत -
 दोस्तों ! अब मंच पर सुविधा नहीं है,
 आजकल नेपथ्य में संभावना है।
असे म्हणत ते जणू समजावतात की दर्शनी माध्यमांच्या राजकारणाचा प्रकाशच फक्त डोळे दिपावणारा असतो; पण तुम्हाला तुमचे डोळे उघडावे असे मनस्वी वाटत असेल तर समाजभानयुक्त व्यक्तिगत व्यवहार सातत्यच रामबाण उपाय होय. 'मला काय त्याचे?' असे म्हणण्यातील निरीच्छता म्हणजे गैरव्यवहार व व्यवस्थेचे मूक समर्थनच असते. 'चलता है' म्हणणेही तसेच असते. मी सहन करणार नाही, चालू देणार नाही, मूक भागीदार होणार नाही, निष्क्रिय राहणार नाही. चिमणीच्या चोचीतील पाण्यातही जंगलाचा वणवा विझवायची ताकद असते, ही केवळ कविकल्पना किंवा कल्पनाविलास नाही. उलटपक्षी बदलाची दुर्दम्य बांधीलकी व्यक्त करणारी ती खारीची धडपड असते.




सामाजिक विकासवेध/१८२