पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 देशाचे पंतप्रधान सरळ अन् पारदर्शी असून चालत नाहीत; जनता सबळ व पारदर्शी हवी. गेली पंधरा वर्षे आपणास तुलनेने सचोटीचे पंतप्रधान मिळाले. आपण काहीच शिकलो नाही नां? कामाच्या वेळेत कामावर नसणे आपणास स्वतः गुन्हा वाटायला हवा. वेळेपूर्वी काम करण्याची, उरकण्याची सवय हवी. इतक्या छोट्या गोष्टीतून भारताचा कायापालट घडू शकतो. रोल मॉडेल' आपल्या लेखी ‘सेलेब्रिटी' झालेत याचा अर्थ त्यांचा गुण न घेता नुसती थोरवी गायची, गर्दी करायची, टाळ्या वाजवायच्या. काम खतम्, फत्ते ! ना देणे, ना घेणे, नुसते कंदील हलवणे! यातून काय माणूस घडणार? आपण भारावतो; पण भारावून कृती नाही करीत. लाक्षणिक कृती, प्रतीकात्मक निषेध, निदर्शने यांतून प्रबोधन, प्रचार, प्रसार होतो, हे खरे आहे; पण जोवर आपला व्यवहार एखाद्या विचाराशी बांधील राहत नाही, तोवर परिवर्तन अशक्य. सार्वजनिक वीज, नळ, पंखे आपल्या करातून वापरले जातात. त्यांचा संयमित वापर व अनावश्यक वेळी ते चालू राहणे याचा आपणास त्रासच व्हायला हवा. जे घरी होते ते दारी का नाही? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारते झालो, अस्वस्थ झालो तरच सार्वजनिक बचत शक्य आहे. वेळेचे पालन, कार्यतत्परता या ध्यासाने माणसे पळताहेत असे सार्वजनिक दृश्य नाही प्रत्ययाला येत. पोलिसाची नाही भीती वाटत. अधिका-याचा जरब नसणे यात शिथिलता क्षम्य असाच भाव असतो.
 कोणताही नियम, कायदा करा; पळवाट शोधायची वृत्ती राष्ट्रद्रोह नाही का? पूर्वीच्या तुलनेने बस, रेल्वे, विमानसेवेत वेळेचे पालन वाढलेले दिसते. मग कार्यालयातील कागदपत्रांचा उरक, कोर्टातील प्रकरणांची निर्गत, पोलीस चौकशीत तत्परता यांतूनच देशाची कार्यक्षमता ठरणार. बांधिल जबाबदारीचे तत्त्व, जबाबदार धरण्यात कसूर न करणे, नियमभंगास शिक्षा, दंड होणारच असा संदेश देणारे प्रशासन असणे आवश्यक. लोकशाही म्हणजे प्रगल्भ आचरण. मनमानी म्हणजे लोकशाही, पंचायत राज्य नव्हे. लोकप्रतिनिधीवर जनतेचा धाक केवळ मतपेटीतून येईल तो पाच वर्षांतून एकदाच लॉटरीसारखा दिसणार. तो रोज लोकसेवक भूमिका बजावतो का? त्याचे धोरण व्यापक आहे का? का तो नुसता मतदारांना जबाबदार. जनतेस जबाबदार लोकप्रतिनिधी का नसावेत?
 हे नि असे कितीतरी प्रश्न मला रोज अकारण बेचैन करीत राहतात. कारण माझे रोजचे आचरण या प्रश्नांचे उत्तर असते. ‘सत्य असत्याशी, मन केले ग्वाही नाही मानियले बहुमता ।।' म्हणत मी जगतो, म्हणून लोकादरास

सामाजिक विकासवेध/१८१