पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी होतंय. मी सुधनला खोदून विचारल्यावर तो म्हणाला, “अंकल, टीचिंग, टीचर्स सब फॉर्मल हो गया है। कोचिंग क्लास तो बक्वास है अंकल । जो सेल्फ स्टडी करेगा, वही सिकंदर होगा।' मला हे जास्त अॅप्ट वाटलं नि फॅक्चुअल पण ! सी. बी. एस. सी.ला बसलेली नगिना ... तिचे पालक त्यांनी ठरवूनच टाकलंय. प्रायव्हेट कॉलेजला घालायचं. कॅश कोर्सेस करीत करिअर, कॉन्फिडन्स व क्वालिफिकेशन अचीव्ह करायचं. हा फंडा मला 'लई भारी कोल्हापुरी/सोलापुरी'... काही म्हणा भिडला, भावला खरा!
 मी उगीच या निमित्तानं इतिहासात, भूतकाळात जाऊन स्मरणरंजन करून पाहिलं... मी १९६७ साली एस. एस. सी. (अकरावी) झालो. असाच ३०, ३१ मे ला रिझल्ट लागला. मी पंढरपूरला होतो. त्या वेळी वर्तमानपत्रांत रिझल्ट छापून यायचा. विशेष म्हणजे लंगोटी वर्तमानपत्रांतही आख्ख्या महाराष्ट्रातील पास विद्यार्थ्यांचे नंबर केंद्रनिहाय छापून यायचे. पेपर दोन आण्यांचा. तो आदल्या रात्रीच प्रसिद्ध व्हायचा. किंमत मात्र दुप्पट, साप्ताहिक ‘गोफण'च्या कचेरीत आम्ही चार आण्यांत निकाल बघितला. त्या वेळी ‘परीक्षेचा निकाल' असाच शब्द रूढ होता. त्याचंही एक कारण होतं. त्या काळात ‘निकाल लागणा-यांची (नापासांची) संख्या अधिक होती! परीक्षा नि निकाल दोन्हींचे प्रचंड टेन्शन असायचे. निकालात जी एक्साईटमेंट होती ना, ती आजच्या रिझल्टमध्ये नाही. सब घोडे बारा टक्के पास अधिक ... नापास कमी. ही सारी मायबाप सरकारची किमया... विनापरीक्षा सगळ्यांना पुढे ढकलायचं. आमच्या वेळी परीक्षा निकालावर तीन शेरे असायचे. पास।। वर चढवला/ढकलला ? नापास. गुरुजी नापास निकालावरील ‘नापास' शब्दाखाली आठवणीने ठेवणीतल्या लाल पेनाने अधोरेखित करायचे. नापास मुलं केव्हा गुल व्हायची कळायचंदेखील नाही.
  त्यानंतरचा उत्सव मार्क्सलिस्ट पाहण्याचा असायचा. त्या वेळी मार्क्सलिस्ट पुण्याहून यायचं. ते यायचं लहरीने... म्हणजे दिलेल्या तारखेला कधीच यायचं नाही. सारी पोस्टाची मर्जी. मला गणित, इंग्रजीत ३६ मार्क्स मिळाल्याचे पाहून काय आनंद झाला होता म्हणून सांगू! त्या काळात

आमची माफक अपेक्षा असायची, सर्व विषयांत पास म्हणजे झिंदाबाद ! अटकेपार झेंडा ! मला ४९ टक्के गुण मिळाले होते. त्या वेळी एस. एस. सी.त नंबर मिळवणारे पी. डी.त गचकायचे आणि एस.एस. सी. त ५0% गुण मिळविणारे कॉलेजात फर्स्ट क्लास यायचे. मी त्याचं जिवंत उदाहरण !

सामाजिक विकासवेध/१७