पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटतो व तो अप्रदर्शनीय ठरतो. यातच सर्व आले. राष्ट्राभिमान ही विचाराची अभिव्यक्ती नसून आचार आविष्कार होय.
 हे सर्व आकलन म्हणजे आपला सांस्कृतिक व्यवहार होय. जे जे देश मोठे झाले, ज्या संस्कृती विकसित झाल्या, त्या क्रांतीने नसून उत्क्रांतीने. समाज परिवर्तन सामूहिक रूपात प्रत्ययास येत असले तरी व्यक्तिगत सहभाग व प्रतिसाद ही त्याची पूर्वअट असते. तुम्हाला देश, समाज जसा घडवायचा त्याचा आराखडा तुमच्या मनी निश्चित हवा. नियोजन व शिक्षण हे घटक समाजविकासात एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ज्या समाजास वापरता येतात, तेच देश अपेक्षित बदल घडवून आणू शकतात. चीन, जपान, कोरियासारखे देश पहा. सिंगापूर, फिनलंडसारखे छोटे देश जे करू शकतात, ते खंडप्राय देशांनी का नाही करून दाखवायचे अशी विधायक, सकारात्मक ऊर्जा नि ईष्र्याच हे करू शकते. त्यासाठी जाज्ज्वल्य देशाभिमान हवा. तो केवळ राज्यगीत, राष्ट्रगीत गाऊन येत नाही. रोजच्या व्यवहारातील तुमचे वागणे, गुणगुणणे यातून ते साकारायला हवे. 'मी' का 'देश' या क्रमावरही तुमचे विकास भविष्य ठरत असते. हक्ककेंद्री नागरी समाज कर्तव्यकेंद्री करणे हे वर्तमान भारतातील शिक्षण व समाज परिवर्तनापुढचे खरे आव्हान आहे. तसेच आपण जात, धर्मनिरपेक्ष समाजव्यवहार रूढ करू शकतो, का यावरही आपल्या विकासाचे फलित अवलंबून आहे. खरे तर विविध संकीर्णता, संकुचितताच आपल्या विकास व आधुनिकतेतील खरा अडथळा आहे. तो दूर करण्यावरच आपले भविष्य आधारलेले असणार आहे.

सामाजिक विकासवेध/१७७