पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोंधळ, अव्यवस्था दिसली नाही. 'Work is worship' आपण म्हणतो. पूजेसारख्या एकाग्रतेने काम नाही करीत. जपानमध्ये असताना एका बुटाच्या कारखान्यातील संपाबद्दल मी ऐकल्या, वाचल्याने आठवते. संपाच्या काळात त्या बुटाच्या कारखान्यातील कामगारांनी एक अभिनव गोष्ट केली. आपल्या भाषेत त्याला 'गांधीगिरी'च म्हणावे लागेल. बुटाच्या कारखान्यात एकाच वेळी डावे आणि उजवे बूट तयार होत असतात. त्यांनी संपाच्या काळात फक्त डावेच बूट करायचे ठरविले. म्हणजे संप असला तरी पहिले म्हणजे काम करायचे. दुसरे म्हणजे उत्पादन थांबवायचे नाही. उत्पादनात कमी येऊ द्यायची नाही. म्हणजे हजार जोड तयार होत असतील हजार जोडच तयार करायचे; पण निरुपयोगी. दोन हजार डावे बूटच तयार करायचे. नंतर माझ्या काही दिवसांनी वाचनात आलं. तिथल्याच वर्तमानपत्रातून, की त्या संपाने कारखान्याला फायदाच झाला. संपाच्या काळात निरुत्पादक डाव्या बुटाइतके उजवे बूट कामगारांनी अधिक वेळ काम करून भरून काढले. अधिक उत्पादन झाले. पगारवाढ मिळाली व उत्पादनवाढ पण झाली. असं कार्यपूजेचं भान, कर्तव्यनिष्ठा, कार्यपरायणता यायची तर कार्य म्हणजे विकास हे लक्षात यायला हवा. कार्यसंस्कृतीत कार्य चोख, वेळेत, पूर्णत्वयुक्त करणं अपेक्षित असतं. काळ, काम, वेगाचं गणित पाळणं म्हणजे कार्यसंस्कृती. कार्य व उत्पादन गुणवत्ता पूर्ण असणं म्हणजे कर्तव्य बजावणं. आपल्याकडे फक्त सैनिक सीमेवर कर्तव्य बजावतात म्हणून आपला देश स्वतंत्र. सुराज्य जागरूक नागरिकच निर्माण करू शकतात, हे आपण खूणगाठ म्हणून समजून घेतले पाहिजे.
 कामात केलेली छोटी चूकही जगाच्या जिव्हारी कशी लागते, ते मी युरोपच्या दौ-यात इटलीला असताना अनुभवले आहे. मी व्हेनिस शहर पाहायला गेलो होतो. जगातील अनेक सुंदर शहरांपैकी एक व्हेनिस, समुद्र, कालवे, रेल्वे जाल तिथे सुंदरता! वारसा जपणारं शहर म्हणून व्हेनिस ओळखलं जातं. आम्ही तिथून रेल्वेने परतणार होतो. रेल्वेला वेळ होता. गाडी फलाटावर लागत होती नि दुसन्या गाडीवर जाऊन आदळली. माझ्या दोन-तीन महिन्यांच्या युरोप प्रवासात पाहिलेला तो पहिलाच अपघात म्हणून मी व माझ्या सहका-यांनी अपघाताचे पटापट फोटो घेतले. ते पाहून लगेच पोलिसांनी आम्हाला घेरले आणि फोटो न काढण्याची विनंती केली. इतकेच काय तर काढलेल्या फोटोचे रिळही मागितले. विचारताना म्हणाले, 'It is insulting as well as disguising'. अपघात पोलिसांना अपमान

सामाजिक विकासवेध/१७६