पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोळ्यांपुढे ठेवून, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जिणे-जगणे लक्षात घेऊन येथून पुढील वयोश्रेष्ठांसंबंधी धोरण, नीति, निर्धारण, योजना निश्चितीचा आधार प्रमुख आधार ग्रामीण वयोश्रेष्ठ राहायला हवा.
२. महिला व बालकल्याण, आरोग्य, सामाजिक न्याय, मानव संसाधन, ग्रामीण विकास, कुटुंब कल्याण इत्यादी शासकीय मंत्रालये यांच्यात ग्रामीण वयोश्रेष्ठात हक्कजाणीव, योजना प्रचार, सुविधा लाभ या संदर्भात समन्वित प्रयत्न करणे आवश्यकच नसून आता ते अनिवार्य करणे काळाची गरज बनली आहे. या मंत्रालयांच्या योजना व आर्थिक तरतुदींचा सरळ व प्रत्यक्ष लाभ ग्रामीण वयोश्रेष्ठांना मिळावा म्हणून लक्ष्यकेंद्रित क्रियान्वयन कार्यक्रम हाती घेण्यात यावा.
३. वयोश्रेष्ठांसंबंधीच्या हक्कांबद्दल वयोश्रेष्ठांसाठी हक्कजागृती अभियान राबविणे व समांतरपणे तरुण व प्रौढांमध्ये वयोश्रेष्ठांसंबंधी कर्तव्यपूर्तीचे आदरभान जागृत करणे आवश्यक आहे. असे उभयपक्षी व परस्पर समन्वयी प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठांचे जगणे सुलभ, सुसह्य व सन्मानाचे होऊ शकेल.
४. वयोश्रेष्ठांच्या संरक्षण, प्रतिबंधन, उन्नयन, सहभागित्व अशा भिन्न प्रकारच्या योजना, प्रयत्नांतून वयोश्रेष्ठांसंबंधी संवेदन अभियान राबवले गेले तर त्यांच्याबद्दल आज असलेला उपेक्षाभाव व वंचना कमी करणे, त्यांचा -हास करणे शक्य आहे.
५. जपानच्या धर्तीवर नियमित तपासणी, निदान, उपचार यंत्रणा निर्माण करणे. वयोश्रेष्ठांसाठी आहार योजना सुरू करणे. ग्रामीण भागात वयोश्रेष्ठांसाठी उपचार केंद्र, विरंगुळा केंद्र, आहार केंद्र, जेनेरिक औषध दुकाने सुरू करणे. आहार, उपचार, विरंगुळा, पर्यटन इत्यादींसाठी ग्रामीण वयोश्रेष्ठांना मासिक निर्वाह वेतन सुरू करणे आवश्यक आहे. आहार, उपचाराच्या मोफत सोईने ग्रामीण वयोश्रेष्ठांचे जीवनमान उंचावणे व आयुष्यमान वाढविणे गरजेचे आहे.
६. पंचायत राज्य योजनेंतर्गत वयोश्रेष्ठ सुरक्षा योजना सुरू करून त्यांच्या गरजांवर केंद्रित विविध कल्याणकारी व विकास योजनांची पुनर्रचना करण्यात येऊन त्यांची वयोश्रेष्ठ हक्ककेंद्री कार्यवाही करणे.
७. इंदिरा आवास योजना, इंधन पुरवठा, अन्नपूर्णा योजना इ. सर्व

प्रकारच्या लाभ योजनेत वयोश्रेष्ठांना प्राधान्य देणे.

सामाजिक विकासवेध/१७०