पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सफरचंदासारखे होऊन गेलेय. खाये तो पछताये, न खाये तो भी!' या गदारोळात स्त्रीचे जगणे, कधी नव्हे इतके कठीण होऊन गेले आहे. छप्पर कोसळून एकट्या पडलेल्या स्त्रियांची विधिवत एक संघटनाच ‘अवनि' संस्थेमार्फत चालविली जाते. तिचे नावच आहे मुळी ‘एकटी.'
 वर्तमान भारतात स्त्रीचे कोसळणे किती पटींनी वाढले आहे म्हणून सांगू! भारतात कधी काळी हिंदू समाजव्यवस्थेत स्त्रीचे प्रश्न हे अशिक्षितता, दुर्लक्षितता, उपेक्षितता अशा स्वरूपाचे होते. ख्रिश्चन मिशनच्यांनी पाहिले की इथल्या स्त्रीला 'माणूस' मानलेच जात नाही. कुमारी माता, विधवा, बालविवाहिता, सती, परित्यक्त्या ही छप्पर कोसळलेल्या स्त्रियांची रूपे होती. आज छप्पर जन्माआधीच कोसळू लागले आहे. स्त्रीजिवाचा शोध घ्यायचा नि गर्भपात करायचा. त्यातूनही स्त्रीजीव जन्माला आला तर त्या जिवाची हरत-हेने उपेक्षा करायची. आहार, आरोग्य, शिक्षण सर्वांगांनी मुलीला दुर्लक्षायचं. ती कामाच्या वयाची झाली की तिला स्वत:च्याच घरी मजुरासारखे राबायला भाग पाडायचे. वयात आली की तिच्यावर बंधने लादायची. तिला नजरबंदीत ठेवायचे. मुलगा असेल तर तो गावाला सोडलेले बोकड नि ही बांधलेली शेळी. तिने गावच्या पुरुषी नजरेला टक्कर देत जगायचे. गर्दी, बाजार, प्रवासात पुरुषांचे कामुक धक्के खायचे. कमरेवरचे चिमटे सोसायचे. घरी, दारी, संसारी फसव्या भूलथापांची बळी व्हायचे. कधी बलात्कारिता, कधी कुमारी माता तर कधी हाताळलेली म्हणून आयुष्यभर मूक मरण अनुभवायचे. लग्न लोक सुखासाठी करतात म्हणून ऐकून करायचे. ‘दिल्या घरी तू सुखी रहा' म्हणून पाठवण केलेल्या पोरीला परतीचा मार्ग नसतो. चक्रव्यूहात एकलव्यच होता, इथल्या दुष्ट चक्रातील न परतू शकलेल्या एकलव्या अगणित ! पुरुष-सिंहाच्या दावणीला बांधलेल्या हरिण-काळीज भगिनी अनिच्छा संभोग, उठता-बसता सासरी टोमणे, मिळावित्या स्त्रीचे खर्च न करण्याचे जगणे, नोकरीच्या ठिकाणची नोकरी सांभाळण्यासाठी म्हणून केलेले न सांगता येणारे सोसलेले आघात, नकळत केलेले समझोते, कधी-कधी पोटच्या पोरांसाठी घेतलेले नमते. पुरुषांच्या घराला एकच छप्पर असते, आमची घरे, दादले, छपरे अनेक! लोकलाजेचे मिरवते कुंकू नि मंगळसूत्र तेवढे एक असते. आता कळते, मंगळसूत्राला दोन वाट्या का असतात? एक आपली अन् दुसरी जगाची. दोन्ही आतून पोकळ का असतात, ते हल्ली उमजू लागलंय. एका वाटीत मी न फोडलेला हंबरडा भरलेला असतो नि दुस-या वाटीत जगरहाटी, ज्याला ओट्यात भरलेले ओटी (पोटीचे) सुख म्हणते ते! दोन्ही वाट्या

सामाजिक विकासवेध/१६०