पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकाश घेऊन कोसळलेल्या स्त्रिया

 काही दिवसांपूर्वी मासिक ‘जनस्वास्थ्य' चे संपादक डॉ. अनिल मडके यांचा फोन होता. अर्थातच लेखनासंदर्भात. मी ‘छप्पर हरवलेल्या स्त्रिया' विषयावर लिहावं असं संपादक मंडळास वाटतं असं ते म्हणत होते. मी म्हणालो, विषयात थोडीशी दुरुस्ती करू या. हरवलेल्या ऐवजी ‘कोसळलेल्या' असे शीर्षक करूया. हा बदल मी केवळ विषयाची आकर्षकता। वाढावी म्हणून सुचविलेला नव्हता. मी वंचित स्त्रियांसाठी कार्य सुरू केल्यापासून (सन १९८0) आजवर मी पाहत आलो आहे की, पूर्वी स्त्रीचे छप्पर गेलो, हरवले की एकत्र कुटुंबात कोणीतरी पोटात घेणारे असायचे. आज सारी घरे विभक्त झाली आणि माणसं एकटी. परिणामी स्त्रीचे छप्पर केवळ हरवत नाही तर ते कोसळते नि ती त्याखाली दबलीच नाही तर प्रसंगी गाडली जाते. 'निर्भया'सारखी.
  परवा मी स्विझर्लंडबद्दल वाचले. तिथे जगातील अत्युच्च श्रीमंती नांदते आहे. माणसे किती श्रीमंत असावीत? मासिक बारा लाख रुपये मिळविणारे कितीतरी! त्यात विदेशींचा भरणा अधिक. ते एकटे राहतात यात नवल नाही; कारण, ते नोकरीसाठी आलेले असतात. आपली मुले अमेरिकेत जातात तशी; पण स्विझर्लंडचे एतद्देशीय, स्थानिक नागरिक - त्यांचे एकटे राहण्याचे प्रमाणही अधिक. एकटेपणाचा कहर म्हणजे रात्री आठनंतर दिवे लावायचे नाहीत. मोठ्याने बोलायचे नाही. स्मशानशांतता पसरलेला हा देश मी सन १९९० मध्ये पाहिला, अनुभवला आहे. माणसे मेलेली कळतात अनेक दिवसा, महिन्यांनी. असे आपले होण्याच्या आपण उंबरठ्यावर आहोत. भारताची आर्थिक प्रगती होत आहे आणि माणुसकीचा संवेदना निर्देशांक घसरत आहे. मी मध्यंतरी कुठेतरी लिहिल्याप्रमाणे आपल्या नात्यांचे प्रेक्षकीकरण' झाले आहे. आपली नाती कधीतरी 'गोफ' होता. तो आता न सुटणारा ‘गुंता' होऊ पाहतोय. माणसाचे जगणे अ‍ॅडमच्या

सामाजिक विकासवेध/१५९