पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उद्याचा भारत हा जात, धर्मनिरपेक्ष राहणार याच्या पाऊलखुणा आता घरोघरी उमटत आहेत. मोठ्या प्रमाणावर होणारे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, आडनाव लिहिण्याचे टाळणारी नवी पिढी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जात, धर्माचे उच्चाटन करीत माणूसकेंद्री समाज घडवित आहेत. माझी मुलं, माझे विद्यार्थी जेव्हा असे विवाह करतात तेव्हा मी जो विचार सांगितला, आचरला तो काही वाच्यावर उडून गेला नाही, याचं समाधान या उत्तरायुष्यात मला अधिक आश्वासक नि आशादायी वाटतं. उद्याचा भारत जात, धर्मनिरपेक्षच होणार याची मला खात्री पटली आहे. राजकारणी मतांसाठी कितीही उपद्व्याप करीत राहोत; येणारी पिढी त्यांना आपल्या कृती, व्यवहार, आचरणाने उत्तर देत नवा समाज घडवित राहणार आहे. त्यांनी आता स्वत:च स्वत:चं नेतृत्व करण्याचा प्रघात अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयक प्रसंगी व दिल्लीतील बलात्कारविरोधी आंदोलनात दाखवून दिला आहे. आता एका मशालीचे काम अनेक मेणबत्यांनी आपल्या हाती घेतलं असल्यानं ‘खुशाल वाहू दे वारा, ज्याला गरज त्यावर धारा' अशी सामाजिक न्यायाची नवी मांडणी अटळ आहे.