पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घोटात स्वपातकाचे एक-एक दुःख रिचविण्यात जीवनाची इतिकर्तव्यता मानताना दिसतो आहे. पहिली बेटी तूपरोटी' म्हणणारा मुलीचा बाप तिच्या पाठवणीच्या घोरात आता चपला झिजवत नाही. त्यानं गृहीतच धरलेलं आहे, ती जन्माला आलीय ना, मग जगायला तिनं गेलंच पाहिजे.
 नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण हा माणसाने कधी काळी सोय म्हणून निर्माण केलेला चक्रव्यूह आज तोच त्याचा शिकार झालाय. बरं, माणूस संवेदनाहीन झालाय का? तर रोज त्याचा संवेदना सूचकांक वाढताना दिसतो आहे. त्याला शेजारच्या शिये, शिरोली गावांचे दु:ख तेवढे वाटत नाही, जेवढे सीरियाचे स्थलांतरितांचे लोंढे त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. मी त्यांचा, या साच्या विपरितांचा शोध घेऊ लागतो तेव्हा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, माणसाचे विस्तारलेले जग, त्याने त्याच्या जगण्याच्या रोजच्या जाणिवांना बोथट करीत, जगणे यांत्रिक करून टाकले आहे. हा सारा प्रवास फार जुना, पुरातन नाही; अवघा शतकभराचा हा प्रवास !
 विसावे शतक उजाडले ते दोन गोष्टी घेऊन. एक साम्राज्यविस्ताराचे वेड नि समाजसुधारणेचा ध्यास. या दोन्ही गोष्टी खरे तर एकमेकांविरुद्ध होत; पण माणसाने त्या एकाच वेळी कवटाळल्या. त्यामुळे बहुधा त्याचा घात झाला असावा. माणूस जेव्हा परस्परविरुद्ध दिशेने जाणाच्या नावांमध्ये आपले दोन पाय ठेवतो तेव्हा जगबुडी अटळ बनते. पहिले महायुद्ध १९१७ ते १९२० च्या दरम्यान झाले. ऑक्टोबर क्रांतीने जगाला समाजवादाचे स्वप्न दिले. हे स्वप्नपण तो दोन पातळ्यांवर जगत राहिला. एक व्यक्तिगत नि दुसरी सामाजिक, व्यक्तिगत पातळीवर माणसाने स्वविसर्जन केले नाही. परिणामी तो विसंगत जगू लागला. सामाजिक जीवन वास्तविक पातळीवर जगायचे तर स्वविसर्जन अटळ असते. तो मोह त्याला सोडता आला नाही. भारतापुरते बोलायचे झाले तर महात्मा गांधी आदर्श म्हणून सामाजिक विचार मान्य; पण व्यक्तिगत जीवन दुस-या गांधी घराण्याचेच त्यास जवळचे वाटत राहिले; कारण ते स्वार्थाच्या अधिष्ठानावर उभे होते. महात्मा गांधींचे वारस समृद्ध झाले; पण त्यांनी मूल्यव्यवहारांची फारकत होऊ दिली नाही. उलटपक्षी ते ती आपली पुण्याई म्हणत जपताना दिसतात. राजमोहन गांधी, अरुण गांधी त्याची उदाहरणे होत. दुसरीकडे राहल गांधी, वरुण गांधीही आपल्यापुढे आहेत. नैतिकता हे जगण्याचे मूल्य आहे. त्याचे एकदा का नाटक सुरू झाले, की मग तुम्ही जनमताचे राजे नाही होऊ शकत. मग तुम्ही गोळीचे बळी ठरला तरी महात्मा गांधींच्या हौतात्म्याचे तुम्ही वारसदार नाही बनू शकत.

सामाजिक विकासवेध/१५५