पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या सर्व स्मार्ट सोशल वर्करची कार्यशैली, जीवनपद्धती, समाजशीलता, मनुष्यसंग्रही वृत्ती, परहितार्थ निरंतर धडपड सारं अनुभवत, पाहत असताना कवी नारायण सुर्वेच्या काव्याच्या किती तरी ओळी कानांत गुंजारव करीत राहतात. ही मंडळी मला समाजाच्या तळपत्या तलवारींपेक्षा कमी धारदार वाटत नाहीत. सांस्कृतिक भिंतींची बंदिस्तता रोज उद्ध्वस्त करीत नवा उदार समाज घडविणारे हे स्मार्ट समाजसेवक मला वंचित समाजास 'देशसंचित' बनविताना दिसतात. विश्वाचं गोकुळ बनविण्याची यांची उमेद दाद देण्यासारखी खरी. लोकसेवकाची भूमिका निरंतर अदा करणारे हे कलंदर कार्यकर्तेच उद्याची सामाजिक कलाकुसर घडवतील, याची मला खात्री आहे. दुज्यांचे भविष्य स्वउत्सर्जन नि विसर्जनाने घडविणारे हे समाजसेवक ‘सत्याचे प्रयोग' परत एकदा करू पाहत आहेत. सामाजिक गदारोळात त्यांचे सूर्यसंक्रमण माध्यमांच्या लेखी भले नसो; त्यांनी आपल्या कार्याचे शिलालेख प्रत्येक गरजूंच्या हृदयात कोरले आहेत. दीडदमडीचे आयुष्य खचीतच नाही त्यांचे! ते उद्याचे मृत्युंजयी अजेय विजेते होत. त्यांच्याच गाव-वस्तीतून उद्याचा सूर्य उगवेल, अशी माझी खूणगाठ भाबडे स्वप्न नाही, असेल तर ते नग्न सत्य! त्यांना प्रसिद्धीच्या ठिगळाची झगमग नको आहे. त्यांचे खुराड्यातील जगच उद्याचे वायरलेस वर्ल्ड साकारेल. वांदेवाडीतील ही मंडळी. त्यांना पोशाखी जग भुलावत नाही. त्यांना माती, मत नि माणूस असे त्रिवेणी कोंदण खुणावते आहे. अनुभव हाच ग्रंथगुरू म्हणत, ते रोज नवी ओवी अनुभवतात, रचतात. माणसातील समर्थ सर्जनात्मा शोधणारी ही नवचेतन पिढी मला जगण्याची उमेद देत उतारवयातही तरुण बनविते. गफलत जुळवणा-यांच्या जगात नोटबदलापेक्षा ‘वोट' बदल त्यांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून मला उद्याचे जग त्यांचे वाटत राहते. उगीच कुणाच्या पाया पडणारी ही मंडळी नाहीत; पण सलाम ठोकतील तर लक्तरात दडलेल्या महात्म्यांना! धरावेत असे पाय अजून जमिनीवर घट्ट उभे आहेत, ते दिसतात फक्त याच स्मार्ट सम्राटांना! बापाशीपण भांडण्याचे बळ मिळविणार ही पिढी डोळे मिटून ‘नमो नमः' न करता ‘कार्य करा' म्हणून चळवळत राहते. मग त्यांना लाभतो समाजाचा हाऊसफुल्ल सपोर्ट। ‘सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही म्हणून ते गाव-गोसावी बनून रोज नव्या गावी नवा नागरिक घडवत फिरतात, सराईतपणे केलेल्याच्या खाणाखुणा, मागमूस न ठेवण्याचा स्मार्टपणा शिकावा तर यांच्याकडूनच!

सामाजिक विकासवेध/१५३