पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाळा, ग्रंथालय, मीठ सत्याग्रह स्मारक, रोटरी क्लब, वेतोबा देवस्थान सान्यांमार्फत समाजहिताचे कार्य, ते शिक्षण, संस्कृती, साहित्य, कला, सेवा असा पाचपदरी गोफ पदरमोड, झोपमोड करीत स्वत:ची पर्वा न करता करताना पाहतो तेव्हा लक्षात येते की, हा लक्ष्मीपुत्र असला तरी ख-या। अर्थाने समाज-सारस्वतच!
 इकडे आपल्या कोल्हापुरात मिलिंद यादवसारखा तरुण कलाशिक्षक ‘करि मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते समाजाशी त्याचे' म्हणत ‘चिल्लर पार्टी' ही बाल फिल्म चळवळ चालवितो. वर्षानुवर्षे श्रमिक प्रतिष्ठानच्या अवी पानसरे व्याख्यानमालेचे नेपथ्य देखणं, कलात्मक, शिवाय बोधप्रद होईल म्हणून जिवाचं रान करतो. पदरमोड करून आपला समाजबाप कॉ. गोविंद पानसरेंचं सचित्र चरित्र प्रकाशित करतो. असाच एक हरहुन्नरी कलाशिक्षक सागर बगाडे आपल्या कधीकाळच्या अनाथपणाचं उन्नयन पंढरपूरला वर्षानुवर्षे आपल्या डझनभर तरुण मित्रांना घेऊन जाऊन 'मामाचा गाव' सजवतो. आख्ख्या पंढरपुरातील अनाथ मुले नि वृद्ध जमवून आजी, आजोबा नि नातवंडांचे गोकुळ निर्माण करतो. नाच, गाणी, कला, संगीत, निसर्ग सर्वांची संगत जोडत दिवाळी भेट, भाऊबीज ओवाळणी देत आपल्या अनेक अनामिक चाहत्यांच्या हृदयाला साद, हात घालत देत राहतो. असे नसते की सारे कार्य समाजातीलच सुजाण करतात. शासनाच्या निबर यंत्रणेतही माणुसकीचे झरे गुप्त गंगेसारखे वाहत राहतात. इंद्रजित देशमुख, संपतराव गायकवाड, विश्वास सुतार, दिनकर पाटील यांच्यासारखे शासकीय अधिकारी यंत्रणेला विधायक, संवेदनशील, समाजशील बनवित शिक्षकांना साद घालतात. त्यातून प्रेरणा, प्रबोधन, नवऊर्जा शिबिर, ग्रंथमहोत्सव, शिक्षक प्रबोधन करीत राहतात. त्यांना हे चांगले माहीत आहे की, शिक्षक जागा, जाणिवेचा राहिला तर विद्यार्थी घडत राहणार. युवराज कदमसारखा। साहित्यप्रेमी ‘वाचते व्हा' म्हणत शाळा, कॉलेज, विद्यापीठात ‘वाचन कट्टे उभारतो व तरुणांना वाचता करतो, वाचवितो. प्रभाकर आरडे ‘शिक्षक समितीच्या माध्यमातून भारतभर पायपीट करून प्राथमिक शिक्षकांचे चित्र, चरित्र, चारित्र्य बदलावे म्हणून स्वत:च्या वृद्ध आजारांची पर्वा न करता आटापिटा करीत राहतात. रमेश नांगरेसारखा साधा तलाठी, सर्कल असलेला तरुण टेबलासमोर येणा-या प्रत्येक गरजूचा कल्पवृक्ष बनतो. आर. वाय. पाटील यांच्यासारखे तरुण मुख्याध्यापक कोल्हापुरातील सर्वांत ज्येष्ठ तरुण' असलेल्या डी. बी. पाटील यांच्या छत्रछायेत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा शिकवती राहावी म्हणून अनेकानेक उपक्रमांचे फेर, गोफ गुंफत नवा

सामाजिक विकासवेध/१५१