पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, कामगार यांना नियमितपणे वेतनवाढ, महागाई भत्ता, भविष्यनिधी, निवृत्तिवेतन यांचे लाभ मिळून त्यांचा जसा आर्थिक विकास झाला, सामाजिक प्रतिष्ठा वाढली, तशी वरील असंघटित, वंचित, उपेक्षित वर्गांना कधी मिळणार ? ते दलितच आहेत हे आपण स्वीकारले की नाही ? मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, माधव (माळी, धनगर, वंजारी), आदी अन्य मागासवर्गीयांसह वरील असंघटित, वंचित व उपेक्षित वर्ग यांच्या विकासाची जात-धर्मनिरपेक्ष विकास नीती हेच या प्रश्नाचे कालसंगत उत्तर होय. जात, धर्मांचे उल्लेख व त्यावर आधारित सामाजिक न्यायापेक्षा विकास निर्देशांकाधारित सुरक्षा व आरक्षण धोरण राबविले गेले तर सर्वजन सुखाय । सर्वजन हिताय' हा सामाजिक न्याय अमलात येईल. शेतक-यांच्या आत्महत्या आपणास दिसतात; पण वरील असंघटित वर्गाची रोजची फरफट, वणवण आपल्याला केव्हा कळणार ? 'एक गाव, एक पाणवठा', 'एक गाव, एक वस्ती' यापुढे जाऊन 'एक देश, एक नागरिक' अशी व्यापक विकासनीती स्वीकारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जात निर्मूलनाचा विचार व्यक्त केला असल्याने त्याचे उदारपणे स्वागत केले पाहिजे.
 अलीकडे ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापले यांचे मूळ समग्र भाषण माझ्या वाचनात आले. त्यात त्यांनी जातजाणिवांचे रूपांतर जातीय अहंतेत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून तरुण लेखकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तद्वतच नुकत्याच संपन्न झालेल्या तिस-या सम्यक साहित्य संमेलन २०१२ च्या अध्यक्षपदावरून नाटककार जयंत पवार यांचे विचारही महत्त्वाचे वाटतात. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “नव्या समाजरचनेतील नवी वर्ग-वर्ण व्यवस्था नव्या पिढीला समजावून सांगावी लागेल. धर्माच्या नावाने चालविलेली अस्मितेची व मनशांतीची नौटंकी निव्वळ मनोरंजन आहे, हे सप्रमाण दाखवावे लागेल. अर्थनियंत्रणातून संपूर्ण मानवी जीवनावर नियंत्रण करू पाहणा-या पैशाचे चलनी महत्त्व आणि विचारांचेही विनिमयन होऊ शकते हेही दाखविणे जरुरीचे आहे. दूरसंचार आणि माध्यमक्रांतीतून बनत असलेल्या जागतिक खेड्यांत देश, धर्म, जात, प्रांत यांच्या सीमारेषा सहज ओलांडता येतील, प्रसंगी पुसतादेखील येतील.' हे मला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांशी जोडणारं वाटतं. (खरं तर अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार वरील दोन साहित्यिकांच्या पूर्वविचारांचे समर्थन होय.)