पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

न उमललेल्या कळ्यांचे नि:शब्द निःश्वास


धोकाग्रस्त बाल्य
 बाल्य हे मूलतः धोक्यात जन्मते नि वाढतेही. भारतासारख्या विकसनशील देशात अज्ञान, रूढी, परंपरा, जात, धर्म, अंधश्रद्धा, दारिद्रय यामुळे मुला-मुलींचे जीवन अधिक धोकादायक बनत असते. त्यात भारतातील एकंदर कुटुंबरचना, नातेसंबंध यांमुळे बालक व प्रौढ यांच्यामधील विविध नात्यांतील ताणतणाव, दबाव, जबरदस्ती पाहता बालकांची बालपणातील वाढ म्हणजे तणावग्रस्त आणीबाणीच असते. मुलं म्हणजे मुकी, बिचारी कुणीही हाका! माणसापरास मेंढरं बरी अशी स्थिती. घरी, दारी, शाळा, समाजात वावरणारी, उपेक्षा, अत्याचार सहन करणारी बालके म्हणजे मूक गुलामच. अन्याय, अत्याचार, शोषण, हिंसा, क्रूरता, उपेक्षा किती परींनी मुला-मुलींना सामोरे जावे लागते? या शतकाच्या प्रारंभी ‘युनिसेफ'मार्फत लैंगिक शोषणासंदर्भात प्रकाशित अहवालात (Report on Sexual Exploitataion) मध्ये गुप्त अत्याचारात (Clandenstine Scourge) भारत अव्वल असल्याचे नमूद केलेले वाचताना माझ्यासारख्या संवेदनशील माणसाची मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. भारतातील मुला-मुलींचे शोषण किती प्रकारे होते ? उपेक्षा किती प्रकारे होते, हे पाहण्यासारखे आहे. उपेक्षित बालके (Vulnerable children)
१.  हिंसेला बळी पडणारी बालके
२. शस्त्रसंघर्षात पिचणारी मुले-मुली
३. नोंदीशिवाय जन्मलेली अर्भके
४. एडस्सदृश सांसर्गिक रोगग्रस्त अपत्ये
  बालमजूर / वेठबिगार मुले


सामाजिक विकासवेध/१४०