पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपचार म्हणून होत असल्याचं मी अनुभवतो. त्यात डोहाळे, ओटी भरणं, बाळंतपण, बारसं, वाढदिवस, परीक्षेतील यश, लग्न, मयत, माती, दिवस, श्राद्ध, सण... सारं कसं एका उपचाराचा भाग म्हणून सुरू असतं. घरी आनंद निधान जगणं सुरू असताना पै-पाहुणे, नातेवाईक, सोयरे, संबंधी, सहकारी यांच्या निमंत्रण, सांगाव्यानंतरचा आपला व्यवहार उत्स्फूर्त सहभागितेचा असत नाही. पूर्वी लोक एकमेकांच्या घरी सुट्टी, सण, प्रवास म्हणून जायचे. आता लॉजमध्ये राहतात. भेटायला जातात. मधल्या काळात गावी आलेल्या पाहुण्याला घरी जेवायचं निमंत्रण असायचं. आता पाहण्याच्या हॉटेलमध्येच डिनरचं बिल शेअर केलं जातं. पूर्वी माणूसपण केअरिंग' होतं. आता ते ‘शेअरिंग' झालंय. माझा एक मित्र एक प्रसंग फार खुलवून सांगतो. आम्हा दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत. त्यांना पाच भाऊ आहेत. सर्व आज निवृत्त आहेत. (खरं तर सर्व नोकरदार होते. त्यामुळे निवृत्तिवेतनधारक आहेत!) पैकी एका भावाच्या मुलाने घर बांधलं. प्रसंग होता वास्तुशांतीचा. निमंत्रणं सर्व भावांना सपरिवार येण्याचं. मोठ्या भावाचा इतरांना फोन - ‘आपण काय द्यायचं? किती काँट्रिब्युशन काढू या? आता घरच्या कार्यक्रमांनाही लोक वर्गणी काढू लागले. यातील सर्वांची मुले, सुना, नातवंडे विदेशात. सर्व फॉरेन रिटर्न. पण फॉरिनहून रिटर्न झाले की मूळ भारतीय समृद्ध. माणूसपण आज समृद्ध भारतातील उपेक्षित अडगळच काय रद्दी होऊन राहिलं आहे. समृद्धीची रद्दी अशी की कुणाला आपले वृद्ध आई-वडील घरी सोसवत नाहीत. समाजात वृद्ध दाम्पत्ये विजनवासात दिवस काढतात. एकटे किंवा एकटी राहण्याचे प्रमाण वाढत जाणे, माणूसपणाची कसरत न केल्यामुळे आलेले सामाजिक स्थूलपण, बधीरता आणि अंधत्व आहे. आजचं माणूसपण बहुआयामी उपेक्षित होत, 'मी नि माझं'च्या परिघात बंदिस्त होत संवेदनाहीन जिवंत मरण भोगत आहे.

 माणसाचं असं नार्सिसस होणं हा नव्या भौतिक संपन्न काळाचा अभिशाप आहे. मी सोशल नेटवर्किंगवरच्या पोस्ट पाहत, वाचीत असतो. लोक स्वत:चे, बायकोचे, नातवाचे फोटो इतरांनी लाईक करावे म्हणून टाकत असतात. लोकांच्या कॉमेंट्स मी वाचीत असतो. त्यांतील फोलपणा कृत्रिमपणा जाणवत राहतो. लोक सतत वरच्या 'व्हर्जन'मध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असतात. डोंबिवलीतून दादरला येणं त्यांच्या कसरतीचं लक्ष्य असतं. मोबाईल हजारातला असणंकडून हजारोंचा असणं यात त्याची आज इतिकर्तव्यता दिसते. अशा सगळ्या माणूसपणापासून दूर जाण्याच्या कसरतीत कधी तरी एक सुखद क्लिपपण अपवादाने अनुभवायला मिळते. एक

सामाजिक विकासवेध/१३८