पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांभाळ सगळं करणा-या या सबलांना कुणी कधी आदर्श माता पुरस्कार दिला नाही; पण त्यांनी शंभर माणसांचा वटवृक्ष निर्माण केला. १० बाय १० च्या खोलीत आणि पाच-पंचवीस रुपयांच्या मासिक उत्पन्नात त्यांनी आम्हाला अनाथाचं सनाथ केलं त्या माणूसघडणीचं मोल मदर टेरेसच्या ‘नोबेल' नि ‘संतपण' या सर्वांच्यापेक्षा मोठं होतं. उपेक्षित, दुर्लक्षित, भूमिगत, अप्रसिद्ध, निरपेक्ष कार्य यासारखा दुसरा धर्म नाही, तर ते माणुसकीसाठी आजीवन लढलेलं एक धर्मयुद्ध होतं !
 या साच्या माणूसघडणीचा माझ्यावर इतका मोठा परिणाम झाला की समज आल्यानंतरच्या काळात हातात हात घेणे, खांद्याला खांदा देणे, एक तीळ सातजणांनी वाटून खाणे अशा जाणिवेतून आम्ही अर्थाअर्थी कोणी एकमेकांचे, जाती, धर्म, रक्ताचे नसतानाही केवळ मानलेल्या नात्याने व आपलेपणाच्या ओढीने एकमेकांचे होत राहिलो. आम्ही सज्ञान झालो तसा संस्थाश्रय संपला. 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा साक्षात्कार परिस्थितीने आम्हास नकळत दिला. मग आम्ही भाड्याने एकत्र खोली घेऊन नोकच्या करू लागलो. स्थिर झाल्यावर स्वतंत्र खोलीत राहू लागलो. आमची लग्नं झाली. ती आम्ही आपसांतच केली. तेव्हा बाहेरची सुस्थळं आम्हा आश्रमियांना मिळत नसत. ती एक अदृश्य अस्पृश्यताच होती. माणुसकीच्या कसोटीवर समाज माणूसघाणाच होता. जात, धर्म, वंश, कुल, गोत्र, पदर, परंपरांत तो अडकलेला होता. त्यामुळे आम्ही अजात, निधर्मी, सहिष्णू माणसं झालो हे आजचा समाज पाहता किती मोठं वरदान आपण कष्टपूर्वक साध्य केलं, याचा आनंद नि अभिमान वाटतो.

 आमचा आकारलेला हा ‘स्नेह सहयोग परिवार म्हणजे स्वकीय विस्तार होता. त्याचा पाया ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असा वहिवाटी कुटुंबासारखा होता. मला समज येईल तसा हा परीघ मी रुंदावत गेलो. म्हणजे मी ज्या शाळा, संस्थांत राहून शिकलो, सवरलो, सावरलो तिथं काही कृतज्ञतापूर्वक करायचं ठरवून नोकरीशिवायचा हाती वेळी सत्कारणी लावू लागलो. रिमांड होमसारख्या संस्था 'घर' कशा होतील हे पाहिलं. राज्यात मुलांचीच रिमांड होम्स होती अधिक. निराधार मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींची बालगृहे सुरू होतील असं पाहिलं. त्यामुळे जात, धर्मापलीकडील आर्थिकदृष्ट्या गरीब मुलींना राहणं, जेवण, शिक्षण मिळत गेलं. आज त्या घरोघरच्या वेठबिगार झाल्या नाहीत याचा आनंद काय वर्णावा? सन १९९० चा एक प्रसंग आठवतो. आमच्या संस्थेस शहरातील अनाथ महिलाश्रम आम्ही जोडला. हजेरीपटावरील मुली

सामाजिक विकासवेध/१३६