पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैसा झाला मोठा, माणूस छोटा


 मला जर कुणी गेल्या नि या शतकातील मोठा एक फरक सांगा असं म्हटलं तर मी क्षणाचीही उसंत न घेता सांगेन की, गेल्या शतकात माणूस गरीब होता; पण त्याच्याकडे गहिवर होता. आज मनुष्य श्रीमंत झाला; पण आपलेपणाचा पाझर आटला. माणूस अप्पलपोटी झाला. माणसाचा कांचनमृग होणं, ययाती होणं ही या शतकाची शोकांतिका आहे नि शापही ! मला माझं बालपण आठवतं. लहानपणी आम्ही सर्वजण शाळेत जात असू. शाळेच्या अवतीभवती काही किराणा दुकानं नव्हती की जावं नि गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट्स आणावी. मुळात खिशात पैसा असणं हाच कपिलाषष्ठीचा योग असायचा. त्याउपर कुणाकडे भोकाचा पैसा असला की वर्गातील सारी मुलं त्याच्या भोवती छोट्या सुट्टीत घोळका करायची. एका भोकाच्या पैशात दोन लिमलेटच्या म्हणजे मोसंबीच्या फोडीसारख्या आकार नि रंगाच्या गोळ्या मिळायच्या. गोळ्या दोन नि मित्रांचा घोळका नि घोळ मोठा. प्रत्येकाला अख्खी गोळी खायचं स्वप्न असायचं; पण ते स्वप्नातही कधी खरं व्हायचं नाही. शाळेसमोर एक आजीबाई टोपलीत बरण्या घेऊन बसलेली असायची. गोळ्या, बिस्किटे, पेपरमिंटच्या वेगवेगळ्या बरण्या असायच्या. चिमणी बिस्किटं, ढब्बू पेपरमिंट, लिमलेट, चिरमुरे, शेंगदाणे, बोरं, शिंदोळ्या हे आमचं सुट्टीतलं स्वप्न! एकावेळी एक पूर्ण स्वप्न गळ्याखाली उतरलं असं कधी झालं नाही. गोळी सदच्यात धरून दातांनी तोडायची. एकाचे दोन करून दोन मित्रांनी मिळून खायची. मित्रही मोठे जिवाभावाचे. मित्राला सोडून एकटं खाण्याचा संस्कार लहानपणी केव्हाच मनात आला नाही. हा काळ १९५६ ते १९६० चा होता. पंढरपूरला लहानपणी पूर यायचा. कोणीही कुणाकडेही बि-हाड घेऊन राहत असे. बडव्यांच्या घरी मुसलमान कुटुंब त्या कर्मठ काळात राहिलेलं मी पाहिलं आहे. आमचा दस्तगीर असो वा न्हाव्याचा संभाजी, मैत्रीत अंतर नव्हतं.

सामाजिक विकासवेध/१३४