पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेलंय ! मनोविकार, रोज वाढताहेत. तो उसनं, शिष्टाचाराचं हसत जगतो आहे. बहुधा चित्रपट 'जैत रे जैत' असावा. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शक होते. गाणं, ना.धों. महानोरांचं असतं, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी...?' कवीला, दिग्दर्शकाला त्या गाण्यातून काय सुचवायचं, काय अभिप्रेत होतं मला माहीत नाही; पण त्या गाण्यातून नेहमीच आनंदाची एक दूर गुंज सतत माझ्या कानांत, मनात हृदयात घुमत राहते. हास्याच्या लकीर लहरीतही मी हे अनुभवत आलो आहे.
 पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, द. मा. मिराजदार, मार्क ट्वेन, हरिशंकर परसाई, काका हाथरसी हे सारे माणसास हसवतात ते कशाच्या जोरावर? तर त्यांना माणसाच्या विसंगतीचं चांगलं भान असतं. माणसानं स्वत:ला रोज आरशात पाहायला हवं. स्वत:शी बोलायला हवं. जी माणसं स्वत:चा विदूषक होऊ देत नाहीत त्यांना हास्यनिधान लाभतं. माणसाच्या हास्याचं नि निसर्गाचं निकटचं नातं आहे. निसर्ग फुला-पानांतून हसतो. माणूस गाला, डोळ्यांतून. डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे' सांगणारा कवी हास्याचा शोधच करीत असतो. निसर्गात फुलणारी फुलं, पाखरं असतात हास्याची कारंजी! फुटबॉल स्टेडियममधला जोश असतो जीवनगाणे!
 हास्य तुम्हाला काय नाही देत? तो थकल्यानंतरचा विसावा असतो. तो ताण-तणावांचा विरंगुळा असतो. तो दु:खावरची फुकर असते. ते मनोविकास घडवते. ते भयावर मात करते. हास्य स्वत:बरोबर अन्यांनाही आनंदी करते. आपणासारखे करूनी सोडावे सकळ जन.' मागील समाजभान हास्यात येतं तेव्हा हास्य भूमितीच्या पटीनं वाढतं. जी माणसं हसत नाहीत त्यांचा भरोसा करणं अवघड. तुम्ही नि तुमचं जीवन आश्वासक, विश्वासार्ह, दिलासा देणारं बनवायचं असेल तर हसत रहा. हास्य, क्रोध, वैर, दुजाभाव, विषमता, अन्याय, अत्याचार आणि सर्वांत म्हणजे मानसिक प्रदूषण थोपवते. हसा, हसवा, हसत रहा!

☐☐

सामाजिक विकासवेध/१०८