पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणताही आडोसा त्याला सार्वजनिक भीती घालत नाही. टू व्हीलरवर आख्खं कुटुंब घेऊन जाणारा नि मोपेडवर मालट्रकाचं ओझं घेऊन जाणारा फिरस्ता तुम्हाला फक्त भारतातच आढळणार!
 हा साच्या आपल्या नागरी घडणीचा प्रताप व परिणाम होय. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी आपणास ‘सफाई’ शिकविली. म्हणून आपण गेली सात शतके दर गांधीजयंतीस म्हणजे २ ऑक्टोबरला ‘सफाई करीत आलो. तरी भारत स्वच्छ झाला नाही म्हणून वर्तमान पंतप्रधानांनी ‘स्वच्छता अभियान' चालविले. शंभर वर्षे आपण केलेली घाण उपसली तरी आपण कच-याचे ढीग हालवू शकलो नाही. घाणीचा गोवर्धन उचलणारा हनुमान, कृष्ण जन्माला यायची वाट पाहत आहोत. गोवर्धन पर्वत उचलण्याच्या कथेच्या चित्रात गुराखी आपल्या काठ्यांचा नि कृष्ण आपल्या करंगळीचा टेकू लावतो असं ते सामूहिक शक्तीचं चित्र माझ्या अजून डोळ्यांसमोर आहे. कच-याचे ढीग का हलले नाहीत असं जर मला विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे की, कचरा करणारे अनेक आहेत नि कचरा उचलणारा एकच (सफाईगार) आहे. ही विषम परिस्थिती आपल्या घाणीच्या साम्राज्याचं खरं कारण आहे.
 या संदर्भात मी फ्रान्सच्या एका शाळेत घेतलेला अनुभव मोठा बोधप्रद वाटत आला आहे. मी एका शाळेस भेट देण्यासाठी गेलो असता, बाई वर्गात शिकवण्याची पूर्वतयारी करण्यासत गुंग होत्या. ती पूर्व तयारी मात्र विचित्र होती. त्या वर्गात ठिकठिकाणी कागद, कपडे, गवत, पानं टाकत होत्या. मी न राहून विचारलं की ही कसली अनोळखी सजावट सुरू आहे? तर त्या म्हणाल्या की मी स्वच्छता शिकवणार आहे. मला या गोष्टीचं राहून-राहून आश्चर्य वाटत राहिलं की त्यांना स्वच्छता शिकवायची म्हणून घाण करावी लागली. आपल्याकडे घाण करावी लागत नाही, ती असतेच. खरी गंमत मला पुढे पाहायला मिळाली. वर्ग सफाई झाल्यावर बाईंनी प्रत्येकाला एक चॉकलेट देऊन खायला सांगितले. वर्गाच्या बाहेर असलेला कचरा टोपलीत चॉकलेटचा कागद टाकायला शिकवलं. हात धुऊन, पुसून आल्यावर त्यांनी दोन स्वच्छतेचं अंतर सांगितलं. नंतर त्यांनी स्वच्छतेची सांगितलेली व्याख्या ऐकूण मी सर्द झालो. त्या म्हणाल्या, ‘घाण न करणे म्हणजे स्वच्छता.' महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी या स्वच्छता अभियानात तुम्हाला या व्याख्येचं प्रतिबिंब दिसतं का? ते जोवर दिसणार नाही, तोवर भारत स्वच्छ कसा होणार?

 आपल्या देशाच्या विकासापुढचा खरा प्रश्न आर्थिक मान उंचावणे नसून जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. अशी घडण ही राष्ट्राची

सामाजिक विकासवेध/९९