पान:साथ (Sath).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. त्याला शिक्षण पुढे चालू ठेवायचं होतं, तेव्हा नोकरी करावी लागल्यामुळे तो नाराज झाला होता. तो फारसा घरी राहातच नसे. कामावरून यायचा आणि चहा घेऊन कपडे बदलून मित्रांच्या बरोबर भटकायला जायचा तो जेवणाच्या वेळेपर्यंत परत येत नसे. मिळवून आणून कुटुंबाचं पोषण करतो तेवढं पुरे, आता त्याची आणखी दखल घ्यायचं कारण नाही असा त्याचा खाक्या असे. निशा बी. कॉम्.च्या शेवटच्या वर्षाला होती. मैत्रिणी, कपडे, कॉलेजातली खरी वा काल्पनिक प्रेमप्रकरणं यांखेरीज तिला गप्पांना विषय नसे. ज्योतीला वाटायचं, आपण कॉलेजात असताना इतक्या उथळ आणि बिनडोक होतो का?
 एखाद्या बऱ्याच वर्षांनी परदेशातनं आलेल्या माणसासारखं तिला तिच्या जुन्या घराशी काही बंध नसल्यासारखं झालं. मग तिला वाटलं, हे बरं नाही. मी आता रामसारखी व्हायला लागले, आपल्या आपल्या जगात मश्गूल होऊन राहयचंन् त्याच्याबाहेरच्या सगळ्यांना परकं मानायचं.
 तिला कंटाळाही खूप आला. दिवसभर कामात बुडून जायची सवय झाल्यावर काही न करता नुसतं बसून रहाण्याचं संकटच वाटायला लागलं. आणि हे सगळं पुरं नाही म्हणून तिला रामची सारखी आठवण यायची, त्याच्याशिवाय सगळं नीरस वाटायचं. तेव्हा शेवटी जेव्हा बाळंतपणानंतर दोनच आठवड्यांत तो तिला न्यायला आला तेव्हा तिला हायसं वाटलं.
 तिची आई म्हणाली, " हे काय ? अवघ्या पंधरा दिवसांत तू प्रवास करणार ? अजून तेवढी शक्ती तरी आलीय का तुला ?"
 " आई, मी अगदी ठाकठीक आहे. पळत पर्वती चढून दाखवते तुला हवं तर."
 " मला कशाला दाखवतेस? तुला माघारी जायचं तर जा बापडी. त्याला वाटत असेल की इथे त्याच्या बायकोचं न् मुलाच कुणी नीटपणे करणार नाही, तर कशाला रहायचं इथे ?"
 " तसं नाही ग. तू अगदी प्रत्येक गोष्टीचा वाकडा अर्थ लावतेस."

८४: साथ