Jump to content

पान:साथ (Sath).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरी बाबांचं मरण काही अगदी सर्वस्वी अनपेक्षित नव्हतं. आणि शेवटी तू असाही विचार करायला पाहिजेस की एक प्रकारे ही त्यांना सुटकाच होती. विकलांग अवस्थेत शरीराची प्रत्येक गरज भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं काही त्यांना विशेष सुखाचं नसलं पाहिजे आणि तुझीसुद्धा सुटकाच नाही का झाली?"
 आई इतक्या त्वेषानं तिच्याकडे वळली की तडाखा चुकवण्यासाठी सरावं तसं ज्योती नकळत मागे सरकली.
  " सुटका म्हणे ! आमच्या नात्याची तुला इतकीच किंमत वाटली ? तुला काय कळणार म्हणा, पण ऐक. तुझे वडील हे माझं जगण्याचं कारण होतं. आता ते गेले. आता कशासाठी जगायचं मी ? मेले तर त्यात आनंदच आहे मला. तुला न तुझ्या नवऱ्याला काय वाटतं दुःख फक्त तुमच्यासारख्या श्रीमंतांनाच असतं ? आम्हाला नसतं ? तो आम्हाला तुच्छ मानतो माहीत आहे मला. पण-"
 " आई, असं का तू म्हणतेस ? रामनं मुळीच कधीही तुम्हाला तुच्छ मानलेलं नाही."
 " नाही ? मग तो असा तडकाफडकी निघून का गेला ? माणुसकी असलेल्या कुणीही अशा प्रसंगी इथे राहून आधार दिला असता."
 " मग राहिला की तो. पण आता तसं त्याला करण्यासारखं काही नाहीये, आणि तिकडे महत्त्वाची कामं तुंबलीयत."
 “ महत्त्वाची कामं असलेला जगात तो काय एकटाच आहे ? अशा वेळी माणसं महत्त्वाची कामंसुद्धा बाजूला सारतात माहिताहे ? पण माझा जावई नाही ते करणार. का नाही ? कारण त्याच्या लेखी आम्ही कुणीच नाही. आम्ही बिचारे गरीब लोक, छोटे लोक. आम्ही मेलो तर ती काय दखल घेण्यासारखी गोष्ट आहे ? छे: ! आता उद्या तुझ्या बापाच्या श्राद्धाला तो का नाही असं कुणी विचारलं तर काय सांगू ? की माझा जावई फार मोठा माणूस आहे, त्याला सासऱ्याच्या श्राद्धाला यायला वेळ नाही?"

७६ : साथ