पान:साथ (Sath).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



  ती आर्थर सीटवर उभी राहून कड्याच्या खाली एक घार संथ लयीत डौलदार घिरट्या घालीत होती तिच्याकडे बघत होती. खाली सावित्रीच्या खोऱ्यापर्यंतचं अंतर पंधराशे फूट आहे हे खरंच वाटत नव्हतं. ती महाबळेश्वरला प्रथम आली तेव्हा ह्या एकाच जागेबद्दल तिनं ऐकलं होतं. त्याआधी काही दिवस एका तरुणाने प्रेमभंगापायी इथून उडी घेऊन आत्महत्या केली होती.
 ती रामला म्हणाली होती, " किती रोमँटिक कल्पना आहे ना? "
 तिचं डोकं फिरलंय की काय अशा आविर्भावात तिच्याकडे बघून तो म्हणाला, " कड्यावरून उडी मारून जीव देण्यात काय रोमँटिक आहे ? "
 " आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून जीव द्यायचा आणि तोही अशा भीषण-सुंदर ठिकाणी, हे रोमँटिक नाही का?"
 "मला त्यात काहीही रोमँटिक वाटत नाही. आणि हे जीवबीव

७२ : साथ