कमिशन मिळत असे. त्याशिवाय शेतकऱ्यांकडून ते काही रक्कम घेतात की नाही याबद्दल राम चौकशी करीत नसे.
ते ऑफिसात आले. " नमस्कार, साहेब. मला बोलावलं होतं? बोला, काय सेवा करू ?"
"वेड पांघरणं बास झालं. तुम्हाला चांगलं माहीताय मी का बोलावलंय ते."
" त्याचं असं आहे साहेब-"
यशवंतरावांच्या रामशी बोलण्याच्या आवाजात, हे बाकीचे सगळे गावंढळ आहेत, पण तुम्ही न मी चार गावचं पाणी प्यालेलो आहोत, आपण एकमेकांना समजू शकतो, असं अध्याहृत असे. रामला त्याचा नेहमीच राग यायचा, कारण तो यशवंतरावांना आपल्याबरोबरीचं समजत नसे.
तो त्यांचं वाक्य मधेच तोडीत म्हणाला, " मला कसल्याही सबबी ऐकायच्या नाहीयेत. मला एवढंच सांगा, तुम्ही लोक तुमचे करार पाळणार आहात की नाही ?"
" मी त्यांना समजावायचा पुष्कळ प्रयत्न केला साहेब, पण ते काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. शेवटी काय आहे, किलोमागे पन्नास पैसे म्हणजे त्यांना पुष्कळ वाटतात. ते लोक गरीब आहेत, साहेब."
"काहीतरी बोलू नका. ते लोक गरीब वगैरे काही नाहीयेत. होते गरीब, पण आता नाहीयेत. का माहीताय ? कारण मी त्यांना खूप पैसा मिळवून दिलाय. बियाणाचं उत्तम पीक कसं काढायचं हे मी त्यांना शिकवलंय, आणि त्यांचं बी उत्तम भाव देऊन विकत घेतलंय. पूर्वी त्यांच्या जमिनीतून मिळायचं त्याच्या दसपट उत्पन्न मी त्यांना देतो. आणि आता त्यांनी माझा गळा कापला तर ते गरीब आहेत ह्या सबबीखाली तुम्ही त्याचं समर्थन करता? गरिबी तुम्हाला वाटेल ते गुन्हे करायची मुभा देते ? आणि हो. तुमच्या स्वत:च्या प्लॉटचं काय ? तुम्ही कुणाला विकताय बी ?"
" मी गावाच्या मताबाहेर जाऊ शकत नाही, साहेब."
" अर्थातच नाही," राम एकदम खालच्या पट्टीत म्हणाला.
साथ:६७