Jump to content

पान:साथ (Sath).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकत नाही. मी कोर्टात जाऊन स्टे आणीन. मला बी मिळालं नाही तरी तेही विकू शकणार नाहीत असं मी पाहीन."
 " पण तसं झालं तर आपलं फाउंडेशन सीड, खतं ह्याचे पैसे आपल्याला कधीच वसूल करता येणार नाहीत."
 " ते मी वसूल करीनच. वसुलीसाठी जप्त्या आणवीन त्यांच्या घरादारांवर. म्हणजे चांगला धडा शिकतील."
 सरकारशी दोन हात करू पाहणं किंवा कोर्टाची पायरी चढणं हया गोष्टींची ज्योतीला मनापासून भीती होती. राम ह्याला उपहासाने तिची मध्यमवर्गीय मनोवृत्ती म्हणायचा. शहाणे असल्या गोष्टींच्या नादी लागत नाहीत. आपण बरे की आपलं काम बरं असं जगतात. त्यात आपल्यावर अन्याय झालाय असं वाटलच तरी भांडण्यात वेळ, पैसा खर्च करण्यापेक्षा अन्याय पचवून पुढे चालू लागतात. ह्याउलट राम ज्या संस्कृतीत वाढला होता त्यात जमिनीची दोन फूट रुंद पट्टी किंवा समाईक बांधावरचं एक झाड यांच्यावरून वर्षानुवर्ष कोर्टकचेऱ्या करण्यात किंवा एकमेकांचे गळे घोटण्यात माणसांना काही विशेष आहे असं वाटत नसे. तेव्हा तो अस्तन्या सारून लढायला सज्ज झाला.
 दुपारी यशवंतराव येऊन हजर झाले. पांढरं शुभ्र धोतर, पांढरा कडक इस्त्रीचा खादीचा सदरा, डोक्यावर तिरक्या ऐटीत बसवलेली गांधी टोपी, गोडबोल्या स्वभाव, किंचित लाचारीचं हसू. अजून फारसा उंचीवर न पोचलेला पण पोचण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा असलेला छोटया गावातला छोटा राजकारणी. पंचायत समितीचे सभासद आणि राम आणि बिरवाडीचे बीजोत्पादक शेतकरी ह्यांच्यातला दुवा. ते स्थानिक नेते असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून बियाणाचे प्लॉट घेणं त्यांच्या फायद्याचं आहे हे त्यांना पटवून देऊन त्यांच्याकडून करारावर सह्या घ्यायच्या हे काम त्यांनीच केलं. नंतरसुद्धा काही अडचण आली तर निवारायची, कशाबद्दल वाद निर्माण झाला तर मध्यस्थी करायची हे सगळं ते करीत. त्यासाठी कंपनीकडून त्यांना शेतकऱ्यांकडून खरीदलेल्या बियाणाच्या किलोमागे ठराविक

६६ : साथ