पान:साथ (Sath).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागतो. म्हणजेच उलाढालीचं प्रमाण वाढत जावं लागतं. आपण एका फिरत्या चक्रावर उभे आहोत आणि त्याच्यावरनं खाली उतरण्याची काही शक्यता नाही असं ज्योतीला वाटलं. धंद्याच्या वाढत्या व्यापामुळे तिला जरा काळजीही वाटायची, कारण आता ते जास्त जास्त कामगारांवर अवलंबून होते, आणि ते कामगार लहरीनुसार कंपनीच्या कामाला खीळ घालू शकत होते. जास्त उलाढालीमुळे जास्त पैसा मिळण्याची शक्यता जशी वाढली होती तशी एकदम मोठं नुकसान होण्याचीसुद्धा.
 रामने बियाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्याचा कारखाना टाकण्यात खूप दूरदर्शित्व दाखवलं होतं. ते साठ ते सत्तरचं दशक होतं. बियाण्याचा धंदा खूप तेजीत होता, नुकताच आपलेपणात येत होता. हायब्रीड जाती त्यावेळी नुकत्याच आल्या होत्या. काही शहाण्यांनी उपरोधाने म्हटल्याप्रमाणे, हायब्रीड ही बियाणं विकणाऱ्याची कामधेनूच. कारण शेतकऱ्याला आपलं स्वतःचं बी राखता येत नाही, दरवर्षी विकतच घ्यावं लागतं. ह्यातला उपरोध सोडला तरी उत्तम प्रतीचं बियाणं तयार करणं हे कोणाही सोम्यागोम्याचं काम नसून त्याला खास ज्ञान आणि तंत्राची आवश्यकता असते हे तत्त्व ह्या सुमाराला स्वीकारलं गेलं होतं. हे नवे वारे ओळखण्यात पुढाकार घेणाऱ्यांच्यात राम होता. त्याच्या बीज - प्रक्रिया कारखान्यामुळे त्याला सुरुवातीला आपल्या स्पर्धकांच्यावर मात करणं सहज शक्य झालं. ते त्याची बरोबरी करायला येईतो त्याची पुढला टप्पा गाठण्याची तयारी झाली होती.
 बियाणाच्या विक्रीचं प्रमाण वाढत गेलं तसतसं इतर शेतकऱ्यांकडून बी तयार करून घ्यावं लागलं. प्रथम फक्त ओळखीचे शेतकरी, मग त्यांना फायद्यात पडतं हे बघून इतर काही अशांनी बियाणाचे प्लॉट घ्यायला सुरुवात केली. पण एकतर हे प्लॉट जिकडेतिकडे विखुरलेले असल्यामुळे त्यांची देखरेख करणं खर्चाचं व्हायला लागलं. दुसरं म्हणजे शुद्ध बियाणासाठी बियाणाच्या प्लॉटपासून त्याच जातीच्या इतर पिकांचं अंतर ठराविक असणं

साथ:६३