पान:साथ (Sath).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं. बुद्धी नसती तर तो धंद्यात इतका यशस्वी कसा होऊ शकला असता? पण व्यवहारात यश मिळवणं वेगळं आणि वाचून, अभ्यास करून एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवणं वेगळं हे राम जाणून होता. बरं, एका बाबतीत माझं श्रेष्ठत्व सिद्ध झालय, बाकी सगळं मरेना का असं म्हणायलाही तो तयार नव्हता. पुढे त्याचा आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या, अभ्यासात चमक दाखवलेल्या लोकांशी संबंध आला तेव्हा तर आपल्या अडाणीपणाबद्दल त्याचं मन त्याला जास्तच खात राहिलं. एकदा ज्योती त्याला म्हणाली, " तू बाहेरून परीक्षेला बसून कॉलेज डिग्री का नाही घेत?".
  ' आत्ता हया वयात ?"
 " वयाचा काय संबंध आहे त्याच्याशी? माणसं कुठल्याही वयात अभ्यास करू शकतात."
 " वेळ कुठाय मला ? आणि मुख्य म्हणजे मला डिग्री आहे की नाही ह्याला काय एवढं महत्त्व आहे ?"

साथ : ६१